बंगळुरूसाठी हेझलवूड परततोय…

आयपीएलचा आठ दिवसांचा ब्रेक सर्वच संघांना फार घातक ठरला आहे. आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू प्ले ऑफनंतर मायदेशी परतणार असल्यामुळे बंगळुरू, पंजाब आणि गुजरातचे टेन्शन वाढले आहे. त्यातच बंगळुरूला पहिलेवहिले आयपीएल जेतेपद जिंकून देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मुख्य गोलंदाज असलेला जॉश हेझलवूड प्ले ऑफसाठी बंगळुरू संघात परतणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याने गेल्या दहा सामन्यांत 18 विकेट घेत बंगळुरूच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याच्या आगमनामुळे बंगळुरूच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सध्या हेझलवूडला दुखापत झाली आहे. तो त्यातून पूर्णपणे बरा झाला नसला तरी तो डब्ल्यूटीसीला समोर ठेवूनच आयपीएलमध्ये खेळणार आहे. तो मायदेशी परतणार आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र बंगळुरू संघ अंतिम फेरी पोहोचतो तर तो 3 जूनपर्यंत हिंदुस्थानातच राहील, अशी शक्यता आहे.