सिनेमा – वर्तमान आणि भविष्यातील रुबरू

<<< प्रा. अनिल कवठेकर

वर्तमानातल्या जगण्यातल्या अप्रतिम सौंदर्याचा आस्वाद न घेता, पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यामागे धावणाऱ्या, उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत वर्तमानकाळाच्या कळ्या कुस्करून टाकणाऱ्या आजच्या काळातील तमाम व्यक्तींकरिता हा संदेश आहे. तो म्हणजे स्वप्नांचा आणि आयुष्याचा काहीतरी संबंध असावा. जीवनात असे अनेक चमत्कार होत असतात की, त्याची उत्तरे विज्ञानालाही देता येत नाहीत. कदाचित ते संकेत असतात भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे आणि स्वप्नाला कधी कधी सत्याची जोड असते. ‘रुबरू’ ही अशाच एका निखिल नावाच्या तरुणाची कथा आहे. त्याने पाहिलेले स्वप्न आणि त्या स्वप्नात त्याला भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर या प्रश्नाचे उत्तर चित्रपट संपल्यानंतरही आपल्याला मिळत नाही.

निखिल (रणदीप हुडा) आणि तारा (शहाना गोस्वामी) लव बर्डस् एकमेकांवर प्रचंड प्रेम करणारे परदेशात एका सुंदर मोठ्या भव्यदिव्य अशा बंगल्यात लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे आहे. ताराची इच्छा आहे निखिलने हिंदुस्थानात येउढन तिच्या आई-वडिलांशी लग्नाविषयी बोलावे. पण निखिल एक मोठा अधिकारी असल्यामुळे त्याच्याकडे वेळ नाही. तो ऑफिसला जायला निघालेला आहे. त्याला प्रेझेंटेशन करायचे आहे आणि तीन नकारात्मक घटना घरात घडतात. ताराच्या हातातील ज्यूसचा ग्लास निखिलच्या शर्टावर पडतो म्हणून त्याला शर्ट बदलावा लागतो. शर्टाच्या कफलिंक्स त्याला सापडत नाहीत. त्यात ताराला चटका बसतो. रस्त्यात ती फुलं घेते. फुलांमधील पाणी त्याच्या कोटावर पडते. ऑफिस जवळ आल्यानंतर तो कारमधून उतरतो तेव्हा त्याचा मोबाईल खाली पडतो आणि खराब होतो.

तारा कॅफेमध्ये बसलेली असताना त्याचे महत्त्वाचे पेपर्स तिच्याकडेच राहिल्याचे तिच्या लक्षात येते. अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींसमोर चाललेल्या प्रेझेंटेशनमध्ये ती शिरते. तो तिला खुणावतो आणि निघून जायला सांगतो. बाहेर पडल्यावर तिच्या लक्षात येते की, ते पेपर जुन्या प्रेझेंटेशनचे आहेत. निखिलचे प्रेझेंटेशन यशस्वी होत नाही. इकडे तारा तिच्या मैत्रिणीबरोबर स्कूटीवर चाललेली असताना तिला निखिल एका ज्वेलरी शॉपमधून बाहेर पडताना दिसतो. ती त्याला आवाज देणार तेवढ्यात सिग्नल चालू होतो. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका बाकावर निखिल बसतो. तो अस्वस्थ आहे. काही क्षणाने तो निघतो. एक टॅक्सी येते. टॅक्सी ड्रायव्हर हिंदुस्थानी आहे. थोडा विक्षिप्तही आहे. त्याला जणू तारा-निखिलचा भविष्यकाळ दिसतो. तो गप्पा मारता मारता निखिलला विचारतो की, तारा एकटी इंडियाला जाणार आहे आणि तू ती आल्यानंतर सगळे व्यवस्थित करणार आहेस, पण ती जर परत आली नाही आणि तुला ते सगळे व्यवस्थित करण्याची संधी मिळाली नाही तर?

निखिल चपापतो. टॅक्सी चालकाचं बोलणं त्याला विक्षिप्त वाटतं, पण ते त्याला कुठेतरी पटलेलं असतं. ताराच्या नाटकाच्या शोसाठी निखिल निघालेला असतो. तारासाठी तो फुलांचा गुच्छ घेतो. नाटकाला तो उशिरा पोहोचतो. नाटकाच्या मध्येच जांभया देतो. आणलेली फुलं तो त्याच्या सीटवरच विसरतो.

दिवस अजून संपलेला नाही. त्या दिवसात अनेक घटना घडलेल्या आहेत. निखिलला दोघांच्या भविष्याची काळजी आहे. तिला वर्तमानात जगायला आवडतं. इथपर्यंत चित्रपटाची 40 मिनिटं संपलेली असतात. या 40 मिनिटांत विशेष काही घडत नाही. नाटकानंतर तो तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो आणि तिथेच क्लाएंटलाही बोलावतो. तिला एकटीला सोडतो. ती चिडते आणि हॉटेलमधून बाहेर पडते. तो धावत तिच्या मागे येतो तिला समजावून सांगतो की, हे सगळं मी आपल्या भविष्यासाठी करतोय. तिला वर्तमानात जगायचं असतं. ती निघून जाते…आणि एक घटना घडते. भविष्याचा विचार करणं आणि वर्तमानात जगणं हे दोन विचार इथे प्रकर्षाने जाणवतात, पण उद्याचं भविष्य हे आजचं वर्तमान असू शकतं. भविष्य जेव्हा उजाडतं तेव्हा तो काळ वर्तमानातलाच असतो. त्यामुळे निखिलचं उद्याच्या भविष्याकरिता जे काही व्यवस्थापन चालू आहे ते चुकीचं नाही. पण का कोण जाणे, तिच्या ते लक्षात येत नाही आणि हीच या चित्रपटाची वन लाईन आहे.

तारा ज्या टॅक्सीत बसते त्याचा टॅक्सीचा ड्रायव्हर निखिलला सकाळी भेटलेला तोच असतो. टॅक्सी पुढे जाते आणि सिग्नलवर थांबते. क्षणभर असं वाटतं की, निखिलने धावत जाऊन तिच्याशी बोलावं, पण तो जात नाही. तारा रडत असते. पाऊस पडत असतो. टॅक्सी पुढे निघते आणि… धड्डाम…! टॅक्सीला मोठा अपघात होतो. निखिल धावत जातो. ताराला खूप मार लागलेला असतो. तो तिला आपल्या मांडीवर घेतो आणि जागेवर बसूनच ओरडतो सम बडी हेल्प मी! त्या संवादातून, संवादांच्या ध्वनीतून त्याचे तारावर असणारे प्रचंड प्रेम व्यक्त व्हायला हवे होते. पण ते होत नाही. ती संधी रणदीप वाया घालवतो.

तिला अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवले जाते, पण ज्या टॅक्सीत ती बसली होती त्या टॅक्सी चालकाचं काय झालं ते मात्र कळत नाही. दिग्दर्शक चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमबाबत फारसा जागरूक नाही असं म्हणावं लागेल. त्याचा सगळा फोकस नायक आणि नायिका या दोघांवरच आहे. ताराची मैत्रीण पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये निखिलला रडताना पाहते, पण तारा आता या जगात नाही. निखिल तिचा फोटो हृदयाशी लावून बसलाय. चित्रपटाचा दिवस मात्र पहिलाच आहे.

आता चित्रपट तिथूनच पुन्हा सुरू होतो. जिथून सुरू झाला होता. निखिलला ऑफिसला जायचं आहे. आज प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्या बेडवर त्याला तारा दिसते. तो गोंधळतो, घाबरतो. मग स्वतःला समजावतो की, ते एक वाईट स्वप्न होतं. तो ताराच्या मैत्रिणीला फोन करून खात्री करतो की, रात्री तू माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतीस का? इथून चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो की नेमकं काय चाललंय?

आधी जे घडून गेलेलं असतं ते चटका बसणं, शर्टावर ज्यूस सांडणं, प्रेझेंटेशनचे पेपर्स विसरणं वगैरे पुन्हा घडतं. पण आता निखिल ताराशी प्रेमाने वागतो. तिला चटका बसत नाही, पण शर्टावर ज्यूस सांडतोच. तो शांत राहतो कारण त्याने हे सगळं आधी पाहिलेलं आहे. तो स्वप्नातला थ्री पीस सत्यात घालत नाही. ती आंघोळ करून येते तेव्हा त्याने स्वप्नात पाहिलेला तोच लाल टी-शर्ट तिने घातलेला असतो. तो मनातून घाबरलेला आहे. त्याला आता दोन तास बाहेर पडायचं नाही. पण ती त्याला प्रेमाने समजावते. दोघे निघतात. तेव्हा तिने तेच कपडे घातलेले आहेत जे त्याने स्वप्नात पाहिले होते. जे स्वप्नात घडले ते घडू नये म्हणून तो कारचा प्रवास टाळतो आणि ते ट्रेनने ऑफिसला निघतात. स्वप्नात ती फुलं विकत घेते आणि आताही ती विकत घेते. स्वप्नात तो तिला विश करायला विसरलेला असतो, पण आता मात्र तिला विश करतो. स्वप्नात पाहिलेलं सगळं आताही तसंच घडत असतं. आता निखिलला जे स्वप्नात पाहिलं ते घडू द्यायचं नाही. त्याला तिचा मृत्यू टाळायचा आहे. तो पहिल्यांदा हतबल झालाय. स्वप्नातला टॅक्सी ड्रायव्हर एकमेव त्याला सांगतो की, मी तुला काल भेटलो होतो आणि तू मला आजचे पैसे कालच दिले होते. इथे ट्विस्ट आहे. निखिल ताराच्या मनासारखं करतो. दोघे खूप भटकतात. निखिलच्या घरी जाऊन त्याच्या सावत्र वडिलांनाही भेटतात. प्रत्येक क्षण तो तिच्यासाठी जगतो आणि जगताना त्याला जाणवतं की, मी वर्तमान असंच जगायला हवं. या चित्रपटाचे संवाद कमी पडतात. कारण आज भविष्यामागे धावणाऱया माणसांची संख्या कमी नाही. वर्तमानातले सुखाचे, आनंदाचे, पराभवाचे क्षण एन्जॉय करायला हवेत. हे सगळं तत्त्वज्ञान सुंदर संवादांतून मांडलं असतं तर चित्रपटाचा विषय उलगडला असता. संवाद लेखनाची अप्रतिम संधी असतानाही फक्त शेवटच्या काही सीनमध्ये आठ-दहा संवाद चांगले आहेत.

‘रुबरू’ या उर्दू शब्दाचा अर्थ म्हणजे समोरासमोर येणं. यात कोणासमोर कोण येतं? कुणाला कशाची ओळख खऱ्या अर्थाने होते आणि ही ओळख होण्यासाठी काय काय घडतं? चित्रपटाचा विषय एकदम वेगळा आहे, पण मांडणी परिणामकारक नाही. स्वप्नातील दृश्ये आणि वर्तमानकाळातील दृश्ये जेव्हा जशीच्या तशी घडतात तेव्हा त्यातल्या अनेक बारीक जागा दाखवणं आवश्यक होतं. शेवटी नेमकं काय घडतं हे पाहण्यासाठी वेगळ्या विषयावरचा ‘रुबरू’ यूट्युबवर नक्कीच पाहा.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)