
<<< आशा कबरे-मटाले
फेसबुकवरच्या मुंबईतील महिलांच्या एका ग्रुपचं स्वरूपच गेल्या काही महिन्यांत पालटताना दिसतंय. ड्रेसेस, रिटर्न गिफ्ट, डेकोरेशनचं सामान अशा वस्तूंविषयी चौकश्या करण्याचं प्रमाण कमी होऊन तिथे वैयक्तिक, कौटुंबिक समस्यांमध्ये आधार, सल्ला मागणाऱ्या `निनावी’ पोस्टींची संख्या वाढताना दिसतेय.
आमचं लग्न अलीकडेच झालं. लग्नाआधी पाळीसंबंधी कोणताही त्रास नव्हता, पण लग्नानंतर अति रक्तस्रावाचा त्रास सुरू झाला. औषधं सुरू आहेत, पण नवरा आणि सासरचे त्यामुळे खूप चिडले आहेत. मुलीला हा त्रास असल्याची कल्पना लग्नाआधी का दिली नाही, असा जाब त्यांनी माझ्या पालकांना विचारला आणि आता हा खर्च तुम्हीच करा असंही म्हणाले. त्यांच्या या वागण्याने मी दु:खी झाले आहे…
मुंबईतील स्त्रियांच्या फेसबुकवरच्या एका ग्रुपवर जवळपास सहा-सात महिन्यांपूर्वी हा `निनावी’ संदेश आला होता. आपल्याकडच्या `अरेंज्ड’ लग्नांमधला `हिशेबीपणा’ चव्हाट्यावर आणणारा. ग्रुपवरच्या काही महिलांनी यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया वा सल्ले काहीसे असे होते…
तुझा पती सुशिक्षित आहे ना? अशी समस्या कुठल्याही स्त्रीला कधीही उद्भवू शकते इतकं साधं त्याला कळत नाही. अशा माणसाबरोबर तू राहू कशी शकतेस? नोकरी शोध आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी हो. नवऱ्याची वृत्ती समजून घेतल्याशिवाय मूल होऊ देण्याचा विचारही करू नकोस. आजच्या काळातही असे नवरे असतात? फार उशीर होण्याच्या आत ताबडतोब घटस्फोट घे त्याच्यापासून…
त्या ग्रुपवर कुणी अशा तऱ्हेची वैयक्तिक, कौटुंबिक समस्या `निनावी’ पोस्ट करण्याची ती बहुधा सुरुवात होती. गेल्या चार-सहा महिन्यांत मात्र हळूहळू त्या ग्रुपचं स्वरूपच पालटू लागलंय. आता तिथे वस्तूंची चौकशी करणाऱ्या पोस्टची जागा घेतायत महिलांनी `निनावी’ संदेशांतून मांडलेल्या वैवाहिक, कौटुंबिक, भावनिक समस्या. त्यातले काही निवडक संदेश. माझ्या मैत्रिणीचा 15 वर्षांचा मुलगा एवढ्या-तेवढ्याने तिच्यावर चिडतो आणि शिव्या देतो, `कुत्री’ म्हणतो. त्याच्या बोलण्याने माझ्या मैत्रिणीला खूप वाईट वाटतं. आईला असं बोलू नये हे तिच्या मुलाला कसं समजवावं? तुम्ही सगळे मुलांच्या शिक्षणासाठी बचत कशी करता? घरचा खर्च भागवून निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत कशी करायची? माझ्या नवऱ्याला फक्त 28 हजार रूपये पगार आहे. ईएमआय वगैरे जाऊन 5 हजार रुपये शिल्लक राहतात. आम्ही बचत कशी करावी?
माझ्या पतीला दारूचं व्यसन आहे. दारू प्यायल्यावर तो नाटकं करतो, रडतो, उशिरापर्यंत टीव्ही पाहतो, रात्रभर सोफ्यावर पडून राहतो. दोन वर्षं झाली, त्याला नोकरी नाही. मीच कशीबशी घर चालवते, पण त्याच्या दारू पिण्याने माझ्या सहा वर्षांच्या मुलावर वाईट संस्कार होत आहेत असं वाटतं. मला नवऱ्याला कायमचं सोडून द्यावंसं वाटतंय. मी काय करू?
मी फक्त मन मोकळं करण्यासाठी इथे आले आहे. पार मोडून गेलेय. कृपया कुणी नैतिकतेचे सल्ले देऊ नका. आमचं वैवाहिक जीवन छान कधीच नव्हतं. निव्वळ मुलांसाठी आम्ही एकत्र आहोत. असं असतानाच मला एकजण भेटला. तोही विवाहित होता. आम्ही जवळ आलो, पण हळूहळू ध्यानात येऊ लागलं की, तो निव्वळ त्याच्या मतलबापुरता यात आहे. त्याच्या जीवनात माझं स्थान काय कळत नव्हतं. मला शेअर करण्यासाठी एक कोपरा हवाय, अधूनमधून बोलायचंय म्हटलं, पण त्याला त्यात रस दिसेना. प्रश्न विचारल्यावर तो चिडू लागला. तू सतत कटकट करतेस म्हणाला. माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्याने तिऱ्हाईतासारख्या दिल्या. मी चिडले, खूप वाईटसाईट बोलले, तर त्याने संपर्कच तोडला. सगळीकडे ब्लॉक केलं मला. मला फसवणूक झाल्यासारखं वाटतंय. मला यातून लवकरात लवकर बाहेर पडायला मदत करा.
एका तऱ्हेने आपल्या समाजातील सद्यस्थितीचं प्रतिबिंबच या संदेशांमध्ये दिसतंय, नाही का? पण खासगी गोष्टी या स्त्रियांना फेसबुक ग्रुपवर का मांडाव्या लागत असाव्यात? ग्रुपमध्ये मुंबईभरातील सर्व भाषिक, मराठी-अमराठी महिला असून सर्व पोस्ट्स इंग्रजीत लिहिलेल्या असतात. पण कधी तोडकंमोडकं तर कधी सफाईदार. क्वचित कुणी इंग्रजीतून हिंदी-मराठीतही लिहितं. उत्तरंही तशीच असतात. निरनिराळ्या स्तरांवरची शैक्षणिक, सामाजिक, भावनिक प्रगल्भता दर्शवणारी. सदस्यांमध्ये गृहिणींपासून नोकरदार, सुशिक्षित स्त्रियाही आहेत हे लक्षात येतं. उत्तरं निनावी देण्याची सोय नाही. बहुतेक पोस्टवर दोन-चार तरी कौन्सिलर्स वा वकील स्त्रियाही उत्तरं देतात, पण त्यात सल्ला नसतो. निव्वळ फोन नंबर दिला जातो. प्रश्न विचारणाऱ्या महिला या `व्यावसायिक’ प्रतिसादाकडे वळल्याचं तिथे तरी दिसत नाही. उलट इतर स्त्रियांनी `मोफत’ दिलेल्या सल्ल्यांवर आभार व्यक्त केले जातात. एक महिला समुपदेशक काही वेळा छोटासा व्हिडीओ बनवून संबंधित समस्येवरील आपल्या समुपदेशनाची `झलक’ दाखवते. कौन्सिलिंगची फी अफाट असल्याची नाराजीही एकदा उत्तरात नजरेला पडली आहे.
संबंधित समस्याग्रस्त महिलांना समुपदेशनाची गरज असल्याचं दिसतं, तसंच उत्तरं ही बहुतेकदा निव्वळ `प्रतिाक्रियात्मक’ असतात हेही. उदाहरणार्थ, मुलगा आईला शिव्या देतो या समस्येवर बहुतेक जणींनी `दोन कानाखाली लगाव म्हणजे सरळ येईल’, `घराबाहेर काढ, बाहेर धक्के खाईल तेव्हा अक्कल जागेवर येईल’ अशा छापाची उत्तरं दिली होती, पण एकदोघींनी समजूतदार, प्रगल्भ प्रतिसादही दिला.
आपल्याकडे भावनिक, कौटुंबिक, वैवाहिक समस्यांचं प्रमाण खूप आहे. नातेसंबंधांतील जवळीक कमी होत आहे. एकाकीपणा वाढतो आहे. नात्यांमधील मन मोकळं करण्याच्या जागा कमी झाल्यामुळेच तर हे असं सोशल मीडियावर बोलावं लागत नसेल ना? अनोळखी समुपदेशकासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून, आपली ओळख उघड करून खासगी बाबी शेअर करण्यापेक्षा सोशल मीडियावर `निनावी’ संदेशातून आपली समस्या मांडणं या स्त्रियांना अधिक सोयीचं वाटत असावं. पुरुषही अशाच स्वरूपाचे ताण सोसत असतील. ते कुठे मन मोकळं करतात? हिंदुस्थानी पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण स्त्रियांपेक्षा दुपटीहूनही अधिक आहे. एकूणात, समुपदेशन अर्थात कौन्सिलिंग सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. फी हा अडथळा ठरू नये आणि खासगीपणा जपण्याची सोयही हवी. प्रत्यक्षात सध्या कौन्सिलिंगच्या जगातली परिस्थिती काय आहे, याचा मागोवा पुढील लेखात.