
<<< आशा कबरे-मटाले
मोजक्याच जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीतला साधा विवाहसोहळाही देखणा, त्या दोन जिवांसाठी ‘यादगार’ असू शकतो हे अधोरेखित करण्यासाठी काही नामवंतांनी, सेलेब्रिटींनी आता पुढाकार घ्यायला हवा. मार्च महिन्याच्या प्रारंभी सुरू झालेला अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा अद्यापही संपलेला नाहीच. आपल्या लाडक्या मुलाच्या निव्वळ पहिल्या प्रीवेडिंग सोहळ्यासाठी धनाढ्य उद्योजक मुकेश अंबानी यांनी तब्बल 1260 कोटी रुपये खर्च केल्याचं सांगितलं गेलं होतं. अनेक विदेशी नामवंत व बॉलीवूडमधील चमचमत्या सिताऱ्यांसह दोन हजार पाहुणे गुजरातमधील जामनगर इथे पार पडलेल्या या झगमगाटी सोहळ्यात सहभागी झाले होते आणि सोहळ्याची इत्थंभूत माहिती हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली होती.
दुसरं प्रीवेडिंग मे-जूनमध्ये इटली-फ्रान्सनजीक लक्झरी क्रूझवर पार पडलं आणि अखेरीस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत ‘संगीत’ आदी प्रत्यक्ष लग्नविधी सुरू झाले. 12 जुलैला लग्न आणि पुढचे दोन दिवस रिसेप्शन सोहळे असा एकंदर लांबलचक कार्यक्रम आहे. मार्च महिन्यात या साऱ्याची सुरुवात झाली तेव्हाच अफाट खर्च व श्रीमंतीच्या प्रदर्शनाविरोधात टीकेचा सूर हिंदुस्थानी प्रसार माध्यमांमध्ये उमटला होता. एकीकडे श्रीमंतीचं हे झगमगाटी प्रदर्शन आणि दुसरीकडे दारिद्र्यात खितपत पडलेले देशातले असंख्य गरीब लोक. उपासमारीच्या जागतिक निर्देशांकात हिंदुस्थानचा क्रमांक किती पुढे आहे आणि देशात कित्येकांच्या अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजाही नीट भागत नाहीत याकडे टीकाकारांनी लक्ष वेधलं. विदेशी माध्यमांनीही या बहुचर्चित लग्नसोहळ्याच्या वृत्तांकनात हिंदुस्थानातील टोकाच्या विषमतेचा, विरोधाभासाचा उल्लेख केला. जनसामान्यांनीही समाज माध्यमांवर टीकाटिप्पणी केली, खिल्ली उडवली, पण त्याने कुणाला फरक पडतोय! सगळ्यांनाच काही श्रीमंतीचं हे वारेमाप प्रदर्शन खटकलं नाही.
हिरे-मोती-पाचूंनी मढलेल्या त्या कुटुंबातील स्त्रियांना पाहून काहींचे डोळे दिपलेही. हे धनाढ्य कुटुंब नेहमीच असे ‘अविस्मरणीय’ लग्नसोहळे आयोजित करते असे कौतुकोद्गार काढणारेही होतेच. यातल्या ‘अविस्मरणीय’ या शब्दापाशी थबकायला होतं. कारण सामान्य लोकही लग्नसोहळ्याच्या संदर्भात या ‘अविस्मरणीयते’चाच ध्यास घेताना दिसतात. लग्न सोहळ्याशी कुटुंबाची पतप्रतिष्ठा जोडतात आणि त्या प्रतिष्ठेला ‘साजेसा’ सोहळा झाला पाहिजे म्हणून चार-दोन दिवसांत लाखोंचा चुराडा करतात. आता तर या बहुचर्चित लग्न सोहळ्याने सेलिब्रेशनचे नवे मापदंड तयार केले आहेत. दुसऱ्या कुणीतरी केला म्हणून तसाच किंवा त्याहूनही सरस लग्न सोहळा करायचा ही भावना हिंदुस्थानींमध्ये अगदीच कॉमन नाही का? अगदी गरीबातले गरीबही अनुकरणाच्या या मोहाला बळी पडताना दिसतात.
लग्नांमधला बडेजाव, अफाट खर्च, अनेक दिवस चालणारे विवाह विधी हे सगळं झिरपत झिरपत समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जातं. एखाद्या गरीब घरातल्या मुलीचं लग्न मग कणभरही आनंद सोहळा न उरता घरादाराला आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारा सामाजिक दबावाचा सोहळा बनतो. देशात आजही अनेक राज्यांत मुलगी जन्मल्यापासून तिच्या लग्नाचं ‘ओझं’ बाळगलं जातं. तिच्यासाठी सोनं-नाणं जमवलं जातं. ती कथित प्रतिष्ठित घरी जावी म्हणून ऐपतीच्या पलीकडे जाऊन ‘सासरकडच्यांच्या’ मागण्या पुऱ्या केल्या जातात. ऐन वेळी नवरा मुलगा वा त्याचे आईवडील मोटारसायकल वा कार हवी म्हणून हटून बसतात. लग्न मोडण्यापर्यंत ताणलं जातं. कधी कधी मोडतंही. वरकरणी या मागण्या म्हणजे ‘हुंडा’ नसून मुलीच्या कुटुंबाने स्वखुशीने आपल्या होणाऱ्या जावयाची हौसमौज भागवल्याचं भासवलं जातं.
एकीकडे देशात आजही हे सारं बिनबोभाट सुरू असताना पैसा हातात खेळू लागलेले नवश्रीमंत आणि खरेखुरे श्रीमंत लग्न सोहळ्यांचे नवनवे मापदंड तयार करण्यात मशगूल आहेत. बॉलीवूडपटांमधील झगमगाटी विवाह सोहळे, नाचगाणी आणि तारे-तारकांचे देशी-विदेशी नयनरम्य ‘लोकेशन्स’वर होणारे देखणे विवाह सोहळेही यात नक्कीच भर घालतात. सिनेमातल्या नाचगाण्यांतून घराघरांत पोहोचलेला ‘संगीत’ सोहळा एव्हाना मराठी नवश्रीमंतांच्या लग्नांचाही भाग होऊन बसला आहे. मध्यमवर्गीयांनाही आता ‘संगीता’ची मजा हवीशी वाटू लागली आहे. गावागावांत ‘वेडिंग प्लॅनर्स’ दुकानं थाटू लागले आहेत.
सोन्याचांदीच्या लग्नपत्रिकांपासून मुंबईतल्या नामांकित डिझायनरकडून लग्नासाठी लेहंगा-चोली घेण्यापर्यंतचा खर्च ग्रामीण भागातील श्रीमंतही करू लागले आहेत. गोव्याला वा अन्य प्रेक्षणीय स्थळी प्रीवेडिंग फोटोशूट, लग्नस्थळी दिमाखदार डेकोरेशन, अनेक पद्धतींच्या पदार्थांची रेलचेल असलेला भोजन सोहळा या साऱ्याने खर्चात भर पडून उच्च मध्यमवर्गीयांचे विवाह सोहळे केव्हाचेच 50-75 लाखांच्या घरात गेले आहेत. खरं तर कोविड काळात सामान्य लग्न सोहळ्यांना सोयीस्कर साधं वळण लागलं होतं. कमी खर्चात आणि कमी माणसांच्या उपस्थितीतही आनंदात लग्न सोहळा पार पडू शकतो हे विशेषत: ग्रामीण भागाने अनुभवलं. त्या काळाच्या पाठोपाठ शहरी भागांतही आधुनिक विचारसरणीचे मोजके तरुण-तरुणी साध्या, आटोपशीर विवाह सोहळ्यांचा पुरस्कार करू लागले, पण दुसरीकडे ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’चं गारुडही पसरत राहिलंच.
2010 साली आलेला ‘बँड बाजा बारात’ हा सिनेमा असो की अलीकडच्या काळात गाजलेली ‘मेड इन हेवन’ ही ओटीटीवरची मालिका. हिंदुस्थानींचं झगमगाटी लग्न सोहळ्यांचं वेड आणि त्यामागे दडलेली अनेक संदर्भांतली दांभिकता व सामाजिक प्रश्न यांची चर्चा अनेकदा झाली आहे, पण परिस्थितीत फारसा बदल काही होत नाही. हिंदुस्थानी लग्न ही एक मोठी ‘इंडस्ट्री’ आहे, यातून अनेकांना काम मिळतं वगैरेही म्हटलं जातं, पण या सोहळ्याच्या मागे धावण्यात ‘लग्न’ या संस्थेचा विचारच होत नाही, त्याचं काय? हिंदुस्थानच्या शहरी भागांमध्ये गेल्या काही वर्षांत घटस्फोटांचं प्रमाण 50 ते 60 टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं जातं. लग्न हा निव्वळ ‘सोहळा’ नाही, ती एक सामाजिक ‘संस्था’ आहे. तरुण पिढी निश्चितच आज या संस्थेकडे वेगळ्या नजरेनं, वेगळ्या अपेक्षांनी पाहते. लग्न सोहळ्याच्या झगमगाटी दणदणाटावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा समजून-उमजून वैवाहिक वाटचालीकडे त्यांना वळवण्यावर भर देणं अधिक गरजेचं नाही का?