
<<< दुष्यंत पाटील
रेनेसॉन्स काळातील `माड्रगल’ या पॉलिफोनिक संगीत प्रकारामुळे एक नवीन प्रकारचं वाद्य संगीत जन्माला आलं. हा संगीत प्रकार म्हणजे `कँझोनी’, ज्यात वेगवेगळे वादक एकाच वेळी वेगवेगळ्या मेलडीज वाजवतात. व्हेनिसचा प्रसिद्ध संगीतकार असणारा गॅब्रिअली, विख्यात संगीतकार मांटवर्दी, फ्रेस्कोबाल्डी यांनी `कँझोनी’ या संगीत प्रकाराला एका वेगळ्या उंचीवर नेलं.
रेनेसॉन्स काळात इटलीमध्ये विशिष्ट प्रकारचे गाण्यांचे कार्पाम व्हायचे. एखादी मेजवानी, सामाजिक कार्पाम किंवा दरबारामध्ये हे गाण्यांचे कार्पाम चालायचे. यातल्या गायनाची खासीयत म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची वाद्य संगीताची साथ नसायची. गाणाऱ्यांची संख्या 2 ते 8 असायची. बहुतेक वेळा 4 किंवा 5 गाणारे लोक असायचे. गायनाच्या या प्रकाराला `माड्रगल’ या नावानं ओळखलं जायचं.
माड्रगलमध्ये वेगवेगळ्या कविता किंवा गाणी गायली जायची. धार्मिक प्रकारात हे संगीत मोडत नव्हतं. गाण्याचे विषय वेगवेगळ्या प्रकारचे असायचे. पुराणातल्या कथा, प्रेम, निसर्ग सौंदर्य यांसारख्या विषयांवर ही गाणी असायची. काही वेळेला विनोदी गाणीही यात सादर व्हायची. माड्रगलचं संगीत हे पॉलिफोनिक असायचं. म्हणजे एक गायक एका चालीत एक ओळ गाताना दुसरा गायक वेगळ्याच चालीत वेगळी ओळ गायचा. त्यामुळे माड्रगल ऐकताना एकाच वेळी बऱ्याच मेलडीज ऐकायला मिळायच्या. त्यामुळेच माड्रगलचं संगीत समृद्ध वाटायचं.
`माड्रगल’ हा फक्त गायन करायचा संगीत प्रकार होता, पण या प्रकारच्या संगीतातून एक नवीन प्रकारचं वाद्य संगीत जन्माला आलं. हा संगीत प्रकार `कँझोनी’ नावानं ओळखला जायला लागला. माड्रगलमध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे गायक वेगवेगळ्या मेलडीज एकाच वेळी गायचे तसं कँझोनीमध्ये वेगवेगळे वादक एकाच वेळी वेगवेगळ्या मेलडीज वाजवायला लागले. सुरुवातीच्या काळात कँझोनीचं संगीत अगदी माड्रगलसारखं (म्हणजे गाताही येऊ शकेल असं) असायचं, पण गायला कठीण असणारं संगीत वाद्य संगीतात येऊ शकतं. त्यामुळे नंतरच्या काळात कँझोनीच्या संगीतात गायला कठीण असणारं संगीत यायला लागलं.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, `कँझोनी’ संगीत पॉलिफोनिक असलं तरी ते फ्युग संगीतापेक्षा वेगळं होतं. फ्युगमध्ये `एक्सपोझिशन’ (सुरुवातीला संगीतातली थीम येणं), डेव्हलपमेंट (थीममध्ये कल्पकतेनं बदल करत जाणं, काही वेळेला नवीन थीम येणं) आणि रिकॅप्युटिलेशन (शेवटी पुन्हा एकदा मूळ थीम येणं) असे ढोबळमानाने भाग असायचे. कँझोनीमध्ये असा ठरावीक किंवा बंदिस्त आराखडा नसायचा. ज्या प्रमाणे माड्रगलमध्ये कवितेची वेगवेगळी कडवी वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकायची तशी कँझोनीमध्ये संगीताचे वेगवेगळे भाग येऊ शकायचे. फ्युगमध्ये येणारे आवाज इमिटेशन करायचे (म्हणजे तीच मेलडी काही वेळेच्या अंतरानं वेगळ्या सप्तकात किंवा वेगळ्या पट्टीत यायची). प्रत्येक फ्युगमध्ये इमिटेशन असायचंच. कँझोनीमध्ये मात्र इमिटेशन हा प्रकार काही वेळेलाच यायचा.
रेनेसॉन्स काळात नव्यानं आलेल्या `कँझोनी’ या संगीत प्रकाराला काही संगीतकारांनी एका वेगळ्या उंचीवर नेलं. इटलीमधल्या व्हेनिसचा प्रसिद्ध संगीतकार असणारा गॅब्रिअली यानं कँझोनीमध्ये त्या काळची विविध प्रकारची वाद्यं आणली. वाद्यांचा कल्पकतेनं वापर करत त्यानं `कँझोनी’ हा संगीत प्रकार प्रसिद्ध केला. 1589 मध्ये त्यानं रचलेल्या कँझोनी रचना लोकप्रिय झाल्या. त्या काळात ऑपेरांना संगीत देणारा विख्यात संगीतकार मांटवर्दी यानंही कँझोनी प्रकारातल्या संगीत रचना केल्या. त्यानं कँझोनीमध्ये नाट्यमयता तसंच भावमयता आणली. त्या काळच्या सुप्रसिद्ध ऑर्गनवादक आणि संगीतकार असणाऱ्या फ्रेस्कोबाल्डी या संगीतकारानं संगीत वाद्यांवर असणारं प्रभुत्व दाखवणाऱ्या कँझोनी रचना केल्या. त्या वाजवायला कठीण होत्या. या साऱ्या मंडळींनी `कँझोनी’ संगीत प्रकार अतिशय समृद्ध केला.
रेनेसॉन्स काळात लोकप्रिय असणारा कँझोनी हा संगीत प्रकार बरोक कालखंडातही बऱ्यापैकी चालला, पण सतराव्या शतकाच्या शेवटी शेवटी या रचनांचं प्रमाण कमी व्हायला लागलं. 18व्या शतकात आणि नंतर कँझोनी संगीत फारसं कुणी रचलेलं दिसत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे (नंतरच्या काळात आलेल्या) सोनाटा रचना, ऑपेरा आणि कंचेटो यांचं समृद्ध होत गेलेलं संगीत. सोनाटा, ऑपेरा आणि कंचेटो यांच्या लोकप्रियतेमध्ये कँझोनी हा प्रकार मागे पडला. नंतरच्या काळात कँझोनीसारख्याच, पण थोड्याशा हलक्याफुलक्या स्वरूपाच्या `कँझोनेट्टा’ संगीत रचना काही संगीतकारांनी केल्या. कँझोनी संगीत काय होतं हे पाहण्यासाठी आपण चायकॉस्कीची Violin Concerto in D Major ceOeueer Canzonetta ही संगीत रचना ऐकू या.