हॉकीचा सुवर्णकाळ परतू दे!

जेव्हापासून हॉकी कळायला लागलीय तेव्हापासून हेच ऐकत आलोय की, आपण हॉकीमध्ये आठ वेळा सुवर्ण पदक जिंकलोय. हॉकीवर हिंदुस्थानचेच एकछत्री राज्य असायचे. ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला मानसन्मान फक्त आणि फक्त हॉकीनेच मिळवून दिलाय. हिंदुस्थानच्या ऑलिम्पिकची ओळख फक्त हॉकीच होती. हॉकी म्हणजे हिंदुस्थान होते. हिंदुस्थान म्हणजेच हॉकी होती. सबकुछ हॉकीच होतं आपलं. हेच गेली अनेक वर्षे ऐकतोय. पण ती हॉकी गेली एकदा काय, सुवर्ण पदकापासून दूर झाली ती जवळ येईनाच. गेली 44 वर्षे सुवर्ण आपल्याला हुलकावणी देतोय. अनेकदा प्रयत्न केले, पण तो काळ काय परतलाच नाही.
मात्र पॅरिसमध्ये काही वेगळं घडतंय. आपले अन्य दिग्गज पदकाच्या शर्यतीत धारातीर्थी पडत असले तरी हॉकीचे योद्धे लढताहेत. झुंजताहेत. काल ब्रिटनविरुद्धचा खेळ पाहून तर सुवर्ण पदकाची स्वप्नं पडू लागलीत. जे गेल्या चार दशकांत होऊ शकलं नाही ते पॅरिसमध्ये होणार. कारण आता जो खेळ हिंदुस्थानी हॉकी करतेय तो सुवर्णकाळाला जिवंत करण्याच्या दिशेनेच आहे. सध्या दिशा आणि दशा आपली योग्य आहे. त्यामुळे दोन धक्के और दो, अशीच साऱयांची अपेक्षा आहे.

हिंदुस्थानला ऑलिम्पिकच्या शंभर वर्षांच्या इतिहासात फक्त सोनेरी पदक हॉकीने जिंकून दिलं होतं. हॉकीत सुवर्णांचा षटकार मारण्याचा पराक्रमही फक्त हॉकीनेच केला होता. 1928 पासून ते 1956 सालापर्यंत सलग सहा वेळा हिंदुस्थानने हॉकीचे सुवर्ण जिंकले. हिंदुस्थानची विजयाची ही मालिका पाकिस्तानने खंडित केली. त्यानंतरही आपण 1964 आणि 1980 साली सुवर्ण जिंकलो. पण त्यानंतर आपण केवळ सुवर्ण पदकाची प्रतीक्षाच करतोय. चातकाप्रमाणे ऑलिम्पिक दर ऑलिम्पिक वाट पाहतोय. आता तो काळ परतेल. पण काही केल्या तो क्षणच येत नाहीय. मात्र आता तो माहौल पुन्हा तयार झालाय. हिंदुस्थानी संघ आपल्या सुपर फॉर्मात आहेच. सोबतीला भाग्यही जोरदार आहे. टोकियोच्या अंतिम सामन्यात खेळलेले दोन्ही संघ बाद झालेत. विजेता बेल्जियमचा काटा स्पेनने काढलाय, तर ऑस्ट्रेलियाला नेदरलॅण्ड्सने झुकवलेय. विजेत्या-गतविजेत्यांना हरवणारे स्पेन-नेदरलॅण्ड्स एकमेकांशी भिडणार आहेत आणि दुसरीकडे आपला सामना होतोय जर्मनीशी.

हॉकी हा आपला खेळ मानला जात असला तरी या खेळातही युरोपियन संघाची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच उपांत्य सामन्यात चारपैकी तीन संघ युरोपियनच आहे. जर्मनीची कामगिरी जोरदारच झालीय. त्यांनी फ्रान्सचा 8-0ने, जपानचा 2-0ने तर दक्षिण आफ्रिकेचा 5-1 ने धुव्वा उडवला होता. त्यामुळे जर्मनीला कमी लेखण्याची चूक हिंदुस्थान नक्कीच करणारा नाही. पण ब्रिटनवर मिळवलेला विजय हिंदुस्थानला नवसंजीवनी देणारा ठरला आहे. या सामन्याच्या रणांगणात आपले दहा खेळाडूच होते. अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाले. सर्वांच्याच काळजात चर्रर्र झाले. केवळ 17 मिनिटांचाच खेळ झाला होता. पुढचा 43 मिनिटांचा खेळ दहा जणांनाच खेळायचा होता. हिंदुस्थान संकटात होता. तेव्हा बाजीप्रभूप्रमाणे गोलरक्षक श्रीजेश लढला. त्याने ब्रिटिशांचे सारे हल्ले परतावून लावले. पेनल्टी शूटआऊटमध्ये तर त्याने प्राणाची बाजी लावली अन् बाजी हिंदुस्थानलाच मिळवून दिली. कर्णधार हरमनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, अभिषेक अभिषेक, राजकुमार पाल यांचा खेळ सुपर फॉर्मात आहे. त्यांचा फॉर्म जर्मनीच्या बचावालाही नक्कीच भगदाड पाडेल.

हिंदुस्थानी हॉकीसाठी पुन्हा सुवर्णसंधी लाभतेय हे पाहूनच आनंद झालाय. एकीकडे हिंदुस्थानच्या ऑलिम्पिकवीरांच्या अपयशाने अवघा हिंदुस्थान निराश झालाय. 117 खेळाडूंकडून काय अपेक्षा होती आणि आपली अवस्था काय झालीय. आपण नक्की कुठे कमी पडतोय ते सारेच पाहताहेत. पण पराभवाच्या असह्य उकाडय़ात हॉकीचा विजय गारवा देणारा ठरतोय. हॉकीचे यश समोर ठेवूनच आपल्या हिंदुस्थानात क्रीडा संस्कृतीची छोटी-छोटी पावलं आजवर टाकली गेली आहेत. क्रीडा जगताच्या शर्यतीत आपला हिंदुस्थान खूप मागे असला तरी हॉकीचे यश स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायक असेल. आजवर हिंदुस्थानला हॉकीनेच मान दिलाय. पॅरिसमध्ये तो मान पुन्हा हॉकीनेच मिळवून द्यावा. ऑलिम्पिकमध्ये पदकांची स्वप्नं आपण हॉकीमुळेच पाहू लागलो होतो. जगू लागलो होतो. आमच्या पिढीलाही हॉकीचा तो सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवायचा आहे. तुझे आभार मानायचे आहेत. जे गेल्या 44 वर्षांत घडलं नाही, त्या यशाचा जागर पुन्हा होऊ दे. पॅरिस ऑलिम्पिक शेवटच्या टप्प्यात आहे. पॅरिसहून मायदेशी परतताना ओठांवर या ओळी असाव्यात, यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुमसा नहीं देखा…