<<< डॉ. मनोहर देसाई
महाराष्ट्रातील ‘वारली’ लोककला आज जगभर प्रसिद्ध असून हल्ली अनेक विद्यार्थी, कलारसिक या कलेचे औपचारिक शिक्षण घेतात. तसेच या कलेचा वापर विविध कलाकृतींच्या माध्यमातून करताना दिसतात. विविध सणांच्या निमित्ताने हिंदुस्थानातील गोंड आदिवासी जमातसुद्धा भिंतींवर चित्र रेखाटते. विविध रंगांनी आणि ठिपक्यांनी नटलेल्या ‘गोंड चित्रकले’विषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
हिंदुस्थानातील मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांतील काही भागांतून गोंड जमातीचे लोक वास्तव्य करतात. प्राचीन ऋग्वेदामध्ये या जमातीसाठी ‘गोंड’ हा शब्द वापरलेला नसून तो ‘कुयवा’ म्हणजेच ‘कोया’ असा शब्दप्रयोग वापरला आहे. या आदिवासी समाजासाठी त्यांचे शिक्षण त्यांच्या बोलीभाषेत व्हावे याकरिता ‘कोयाबोली’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. या समाजातील सीताराम मंडले यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिग्गज फॉण्ट डिझायनर कै. मुकुंद गोखले यांनी हे पुस्तक या समाजासाठी तयार करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. संगणकावरसुद्धा गोंडी लिपीचा फॉण्ट तयार करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहे.
‘गोंड’ हा शब्द तसा द्रविड शब्दसंग्रहातील ‘कोंड’ या शब्दापासून तयार झालेला. त्याचा अर्थ ‘हिरवा डोंगर’ किंवा ‘हिरवा पर्वत’ आहे. निसर्ग, वनराईने नटलेल्या डोंगरदऱ्यांमधून वर्षानुवर्षे वास्तव्य करत असलेली ही आदिवासी जमात पुगोंडी जमात म्हणूनच ओळखली जाऊ लागली. याच गोंडी लोकांच्या रोजच्या दिनचर्येमध्ये त्यांनी साकारलेल्या भिंतीवरच्या चित्रांना ‘गोंड चित्रकला’ म्हणून जगभर ओळख मिळाली.
निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या जमातीच्या चित्रांमध्येसुद्धा निसर्ग बहरला. विविध प्राणी, पक्षी, डोंगर, नाले, नद्या, फुले, फुलपाखरे आणि अनेक आनंदोत्सव साजरा करणारी गोंड समाजातील माणसे चित्रबद्ध झाली. या गोंड समाजामध्ये रोजच्या दिनचर्येमध्ये आपल्या घरातील वातावरण व आपल्या दिनचर्येची सुरुवात ही चांगल्या चित्रांकडे पाहून व्हावी अशी भावना आहे. त्यामुळेच गोंड समाजातील घरातील भिंतीवर सुंदर चित्रे रेखाटण्याची प्रथा सुरू झाली. गोंड समाजातील विविध कथा, कविता, संगीत आणि त्यांच्या सभोवताली असणारा निसर्ग आणि त्यातील घटक या चित्रांमध्ये सामावलेले दिसतात.
पांढऱ्या मातीने सारवलेल्या भिंतीवर ही चित्रे रेखाटली जातात. विविध वनस्पती, झाडाची पानेफुले यांपासून माती तसेच शेणाचा वापर करून तयार केलेले रंग या चित्रांसाठी वापरले जातात. चित्रातील आकारांमध्ये पांढरी ठिपके, तुटक रेषा, रेषा व आकारांच्या पुनरावृत्तीने साधलेल्या वेगवेगळ्या डिझाइन्स पाहायला मिळतात. या चित्रांमध्ये त्रिमितीचा भास नसून सपाट रंगलेपन पद्धतीचा वापर केलेला दिसतो. याच सपाट रंगलेपनावर ठिपके, तुटक रेषा यांचा वापर ही या चित्रकलेचे वैशिष्ट्य असणारी शैली विशेष नोंद घेण्यासारखी आहे. पानाफुलांनी बहरलेले झाड आणि त्या झाडाच्या सभोवताली असणारी हरणे, पक्षी किंवा मोर असे अनेक विषय चित्र आकर्षित होण्यास मदत करतात.
चित्रनिर्मितीसाठी कुटुंबातील सदस्य आवर्जून सहभागी होतात आणि रंगलेपनानंतर चित्रावर सचोटीने काम करण्याकरिता महिला पुढाकार घेतात. वारली समाजातसुद्धा चित्रनिर्मितीसाठी महिला पुढाकार घेत असल्याचे दिसते. जसजसा हा गोंड समाज शहरांच्या जवळ येत गेला तसतसे त्यांच्या चित्रातील नैसर्गिक रंगांच्या जागी बाजारातील तयार रंग दिसू लागले. आज अनेक गोंड चित्रकार कॅनव्हासवर अॅक्रेलिक किंवा फॅब्रिक रंगांच्या सहाय्याने चित्रे रंगवतात. काही चित्रकार पोस्टर कलरचा वापर करून त्यातून छोटी छोटी चित्रे व शुभेच्छा पत्रे तयार करतात. त्यांनी निर्माण केलेल्या चित्रांना जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळतो व अनेक कला रसिक ही चित्रे विकत घेतात. गोंड चित्रकला ही जरी पारंपरिक कला असली तरीसुद्धा आता या समाजातील काही कलाकारांसाठी ती उपजिविकेचे साधन बनली आहे.
खुला निसर्ग आणि त्यात असणारे नैसर्गिक तेजस्वी रंग तसाच तेजस्वीपणा टिकवून आज गोंड चित्रकलेचे एक वैशिष्ट्य बनले आहे. पिवळा, लाल, निळा, हिरवा, गुलाबी, आकाशी, जांभळा आणि पोपटी हिरवा अशा अनेक तेजस्वी छटा असणाऱ्या रंगांचा थेट वापर या चित्रांसाठी केलेला दिसतो. ठिपके आणि तुटक रेषा या शैलीच्या वापरामुळे ही चित्रे ‘गोंड चित्रे’ म्हणून सहज ओळखता येतात. अनेक अडचणी आणि समस्यांचा सामना करत जंगलांमधून जगणाऱ्या या जमातीच्या साध्या राहणीमानात भिंतींवर असणारी रंगीबेरंगी चित्रे आनंदाचा बहर आणतात. चांगल्या गोष्टी पाहिल्यामुळे आपल्या सोबतसुद्धा चांगलेच घडेल, आपले नशीबसुद्धा उजळून निघेल अशी भावना असल्यामुळे या चित्रांना गोंड समाजामध्ये घरातील भिंतीवर महत्त्वाचे स्थान आहे.
धकाधकीच्या जीवनात हरवलेले आपण सारे कधीतरी एखाद्या लोककला प्रदर्शनाला भेट देतो आणि त्या वेळी आपल्याला या कलेविषयी माहिती मिळते. ऑनलाइन पद्धतीने चित्रकला शिकण्याकरिता अनेक कला रसिकांनी सुरुवात केली आणि त्यात काही व्यावसायिक कला शिक्षण देणाऱ्या चित्रकार आणि संस्थांनी गोंड कलेचासुद्धा समावेश केला. लेखाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील वारली कलेचा उल्लेख केला. त्यालाच जोडून आता देशातील अनेक भागांमध्ये गोंड चित्रकलासुद्धा आवर्जून वापरलेली पाहायला मिळते. घरातील सजावटीसाठी अनेक लोक बाजारातून मिळणाऱ्या चिनी शोभिवंत वस्तू आणतात.
आपल्या देशातल्या कलाकारांनी घडवलेल्या व त्यामागे काही विशिष्ट भावना असणाऱ्या कलाकृती आपल्या भिंतीवर असायला हव्यात. पाश्चात्त्यांचे अनुकरण करताना नकळत आपल्या परंपरा व संस्कृती यांच्यापासून आपण दूर चाललो आहोत. याउलट आपल्या कला प्रकारातील साधेपणा आणि भावनांचा आदर करत सातासमुद्रापार जगभर या कलांचे भरभरून कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गोंड चित्रकलेला खूप मागणी आहे आणि ती चित्रे उत्तम किमतीला विकली जातात. आपल्या लोककला जिवंत राहाव्यात म्हणून हा शब्दप्रपंच.