‘डंदॅट् बींदेअर’ – लेखिका मेघना पेठेंच्या पुस्तकाचे दमदार स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेघना पेठे हे नाव मराठी साहित्यविश्वाला नवे नाही. स्त्रीवादी लेखनात महत्त्वपूर्ण वैचारिक योगदान देणारे त्यांचे लेखन त्या त्या काळातील संक्रमण दर्शवत स्त्री विश्वातील अनेकविध कंगोरे उलगडणारे आहे. स्त्रियांचे मनोविश्व अत्यंत सडेतोडपणे व तितक्याच पारदर्शकतेने मांडणारी ही लेखिका तिच्या लेखनातील पात्रांतून मुक्ततेचा खरा अर्थ सांगू पाहते. यामुळेच त्यांच्या ‘आंधळ्याच्या गायी’, ‘नातिचरामी’, ‘हंस अकेला’ या कथासंग्रहांना विलक्षण लोकप्रियता लाभली. मात्र मधल्या काळात मेघना पेठे यांचे कोणतेच लेखन प्रकाशित झाले नाही. आता या दीर्घ विरामानंतर त्यांचे ‘डंदॅट् बींदेअर’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. एक संपूर्ण दशक आपल्या कथांनी गाजविणाऱया लेखिकेच्या या पुस्तकाचेही तितकेच दमदार स्वागत होत आहे. दोन दशकांत लिहिलेल्या डायरीतले लेखनासंदर्भातले निवडक तुकडे, लेखनोत्तर आलेले सुखदुःखाचे अनुभव, आठवणी, परखड मत मांडणारा मुक्तसंवाद व व्यक्तिगत जगणं, समकाळ आणि लेखक काय असतो यावर प्रकाश टाकणाऱया मुलाखती अशा तीन भागात हे पुस्तक विभागले आहे. काही लेखक कायम वाचकप्रिय ठरतात. मेघना पेठे या अशाच कालजयी लेखिका आहेत.