
<<< राधा महाबळ
आताचा समाज पाहता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे बहुतांश समाजाने मनःस्वास्थ्य गमावले आहे. ताण, चिंता, दडपण या समस्यांनी समाज त्रासला आहे. प्रत्येकाचे कारण वेगळे असले तरी प्रत्येकजण मनःस्वास्थ्याच्या शोधात आहे. वृषाली लेले यांनी ‘पूर्वस्मृती हीलिंग’ या उपचार पद्धती स्वत विकसित केली आहे. त्याची सविस्तर माहिती देणारे ‘समृद्धी एक भावना’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
‘मानवी मन’ हा एक अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. तुमच्या मनातले सकारात्मक विचार तुम्हाला समृद्ध करू शकतात, तर नकारात्मक विचार तुम्हाला अगदी तळागाळात घेऊन जातात. हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे पण तो कुणी एकदम सोपा करून सांगितला, तर त्याचे आकलन चटकन होऊ शकते. मुळात कोणताही विषय हा दुसऱ्याला सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आपल्या स्वतला तो पूर्णपणे समजलेला असावा लागतो. ‘समृद्धी एक भावना’ हे पुस्तक ‘पूर्वस्मृती हीलिंग’ या एका नवीन उपचार पद्धतीविषयी आपल्याला माहिती देते. नवीन अशासाठी, कारण या उपचार पद्धतीची पूर्ण रचना लेखिकेने स्वत केली आहे. रेकी, सेकिम, प्राणिक अशा अनेक हीलिंगच्या वेगवेगळ्या प्रचलित उपचार पद्धती असल्या तरीही या सर्वांपेक्षा वेगळ्या अशा ‘पूर्वस्मृती हीलिंग पद्धती’ या विषयाला वाहिलेले हे पुस्तक वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. अतिशय किचकट व गुंतागुंतीचा विषय इतक्या कमी कालावधीत व तोसुद्धा सोप्या भाषेत वाचकांसमोर उलगडून मांडायचा, यावरूनच लेखिकेची या विषयाची समज आणि या विषयातले सखोल ज्ञान जाणवते. त्याचा उपयोग आपल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व प्रभावी करण्यासाठी करायचा असेल, तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे हे लेखिका पहिल्याच प्रकरणात आपल्याला पटवून देते.
प्रत्येकाचे मन हे विचारांचे उत्पत्तीस्थान असल्याने व विचार करणे ही प्रक्रिया सतत चालू असल्याने मनावर येणाऱ्या वेगवेगळ्या ताणांचे व्यवस्थित वर्गीकरण लेखिकेने केले आहे. याच विचारांच्या तरंगांमुळे मनात निर्माण होणारे भाव, भावना, चांगले-वाईट अनुभव ग्रहण करताना ज्या भावना उत्पन्न होतात, त्यामुळे एक भावनिक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा आपल्या शरीरावर व वर्तणुकीवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम करते.
सोप्या भाषेत व सोपी उदाहरणे देऊन हे सर्व त्यांनी सांगितले आहे. प्रत्येकाकडे ही समृद्धी असली तरीही स्वतःकडे नेमकी कोणत्या प्रकारची समृद्धी आहे याची जाणीव करून देण्यातच या पुस्तकाचे व पर्यायाने लेखिकेचे महत्त्व अधोरेखित होते.
समृद्धी एक भावना
लेखिका – वृषाली गिरीश लेले
पृष्ठसंख्या – 216 किंमत – 300 रु.