
<<< रविप्रकाश कुलकर्णी
जोवर आहे स्मरण, त्याला कसले आले मरण… हे कितीही खरं असलं तरी स्मरणाचंही स्मरण करून द्यावं. 18 जुलै हा अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन. अण्णा गेले 18 जुलै 1969 रोजी. याबाबत वि. स. खांडेकरांचे प्रदीर्घ काळ लेखनिक असलेले राम देशपांडे यांच्याशी बोलताना त्यांनी खांडेकरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त असणाऱ्या कार्यक्रमाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाता न आल्याने जो संदेश पाठवला तो उपलब्ध करून दिला.
त्यात ते म्हणतात, “प्रतिकूल परिस्थितीतही अण्णाभाऊ साठे यांनी जे विविध साहित्य निर्माण केलं, त्यात त्यांच्या प्रतिभेचा गुण व ग्रामीण जीवनाशी असलेला सर्वस्पर्शी परिचय या दोन्ही गोष्टी उत्कटतेने व्यक्त झाल्या आहेत. ललित साहित्याला सामाजिक जाणीव असणं किती जरुरीचं आहे याची कल्पना त्यांच्या वाङ्मयावरून आपल्याला आपल्या घरट्यात किंवा घरकुलात बसून लिहिणाऱ्या शहरी लेखकांना सहज येऊ शकेल. त्यांचं जीवन या दृष्टीने आज-उद्याच्या लेखकाला प्रेरक होऊ शकेल. साहित्याच्या विशाल क्षेत्रात ‘नांगरल्याविण भुई बरी असे कितीतरी’ ही केशवसुतांची उक्ती आजही सत्य आहे. अशा जमिनीत प्रतिभा आणि परिश्रम यांचा सुरेख संगम करून ती पिकवणारे साहित्यिक ही आपल्या समाजाची आजची निकड आहे. तिची जाणीव अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनाने सर्व लहानथोर लेखकांना झाली, तर तो अत्यंत चांगल्या रीतीने साजरा झाला असं म्हणता येईल.’’
यंदा 18 जुलै 2024 रोजी पुण्यात रतनलाल सोनाग्रा आणि काही संस्था मिळून अण्णाभाऊ साठेंचा स्मृतिजागर कार्यक्रम करत आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडेबहुत, कमी जास्त लिहून आलेले आहे, त्यामध्ये सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित ‘साहित्यसूर्य अण्णाभाऊ साठे ः कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व’ हा संदर्भ ग्रंथ महत्त्वाचा आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्वसुरींचे प्रकाशित झालेले सर्व साहित्य अभ्यासून त्यातील सार आपल्या ग्रंथात अंतर्भूत केलेलं आहे. ‘वाटेगावपासून मुंबईपर्यंत चालत जाताना रस्त्यात भुकेची आग पोटात पेटलेली आहे. अशा अवस्थेत केसनद या गावाच्या महादू चव्हाण या गाडीवानाचा बैल रस्त्यात अचानक मेला. अडचणीत असलेल्या गाडीवानाने अण्णाभाऊंना आपल्या भाकरीतील भाकरी खायला दिली व बैलाऐवजी गाडी ओढायला लावली.’
आता सुरेश पाटोळे लिखित ‘समतेचे मूल्य पेरणारा साहित्यिक’ हे अण्णाभाऊ यांच्या आयुष्यातील घटनांचा, संदर्भाचा अर्थ लावणारे नवे पुस्तक यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होणार आहे. विश्वास पाटीलकृत ‘अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान’ (राजहंस प्रकाशन) हा चरित्र ग्रंथदेखील संदर्भबहुल आहे, पण तो वाचून काही प्रश्न मनात येतात. उदाहरणार्थ, अण्णांची सुरुवातीची पुस्तकं कोणी प्रकाशित केली? ‘फकिरा’ कादंबरीच्या सुरुवातीच्या प्रतींना वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना नव्हती. ते कसे?
ज्याची ख्याती पुढे चित्रपट गीतकार म्हणून झाली अशा शैलेंद्रचे आणि अण्णाभाऊंचे सौहार्दाचे संबंध होते. याच शैलेंद्रने आपला पहिला कवितासंग्रह ‘न्यौता और चुनौती’ अर्पण करताना म्हटलंय… समर्पण… मराठी के कामगार साहित्यिक अन्नाभाऊ साठे को मई 1953… शंकर शैलेंद्र हा संग्रह कामगार प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला.
अण्णाभाऊ साठे यांच्या कुठल्याच चरित्रात ही माहिती कशी नाही? या संग्रहातील कविता ‘शंकर शैलेंद्र’ नावाने आहेत. पुढे हिंदी चित्रपटांतील गाणी लिहिताना यातील ‘शंकर’ हे नाव कसं गळालं?
अण्णाभाऊ साठे यांची दोन टपाल तिकिटं निघाली. तशी ही दुर्मिळ गोष्ट आहे. याची सचित्र नोंद व्हायला हवी की नाही? असे कितीतरी प्रश्न. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न. अण्णाभाऊंचं हस्ताक्षर कसं होतं? त्यांची स्वाक्षरी कशी होती? अण्णाभाऊंनी एखाद्या चाहत्याला स्वाक्षरी देताना कधी संदेश दिला असेल ना?
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवली पाहिजेत असं मी अण्णाभाऊ साठे संदर्भ ग्रंथ संपादित करणारे आसाराम गायकवाड यांना पूर्वी कळवलं होतं. त्याचं पुढे काय झालं हे कळायला मार्ग नाही. हे सगळं आठवलं ते रतनलाल सोनाग्रा यांनी लिहायला सुचवल्यामुळे! वरील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं माझं काम सुरूच आहे. अण्णाभाऊंचे चाहते, अभ्यासक यांची मदत मला हवी आहे. म्हणजे मी अण्णाभाऊ साठेंबाबत अधिक माहितीपूर्ण पुस्तक लिहू शकेन. अण्णाभाऊ साठे यांचं आता इतक्या वर्षांनी सखोल चरित्र येणं महत्त्वाचं. त्यासाठीच ही धडपड.