उद्याची शेती – वैचारिक अधिष्ठानाची कृषीमूल्य साखळी

<<< रितेश पोपळघर >>>

समूह शेतीच्या या विचारातूनच कृषी क्षेत्रातील ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ या मॉडेलची मागील काही वर्षांत चर्चा वाढली आहे. यालाच अनुसरून उभा राहिलेला ‘कृषक स्वराज’ प्रकल्प. देशभरात मिरचीचे उत्पादन होत असले तरी अनेक समस्यांना शेतकऱ्यांना कायम सामोरे जावे लागते. हे ओळखून ‘कृषक स्वराज’ने शेतकऱ्यांना एकत्र आणून मिरची पिकावर आधारित ‘रोपांपासून ते निर्यातीपर्यंत’ संपूर्ण मूल्य साखळीचा एकात्मिक प्रकल्प विकसित केला आहे.

शेतकरी आपल्या बांधकऱ्याचा किंवा शेजाऱ्याचा कायम ‘प्रतिस्पर्धी’ असतो. मात्र आज कुठेही पाहिले तर समूहाने शेती केल्यास शेतीतील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात असे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. कृषी क्षेत्रातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचा पतपुरवठा क्षेत्रात कायम अग्रक्रम राहिला असून त्या बऱ्याच प्रमाणात रुजलेल्या दिसतात. मूलत हे मॉडेल समूह शेतीचेच आहे. कारण शेतकरी एकत्र येऊन या संस्थांची स्थापना करतात आणि लोकशाही मार्गाने त्यांचे काम पुढे चालवले जाते.

समूह शेतीच्या या विचारातूनच कृषी क्षेत्रातील ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ या मॉडेलची मागील काही वर्षांत चर्चा वाढली आहे. या उत्पादक कंपन्या ‘मूल्य साखळी’ या मुख्य संकल्पनेवर आधारित आहेत. महाराष्ट्र राज्यातील शंभरपेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अभ्यास करण्याची संधी आम्हाला मागील काळात मिळाली. त्यापैकी काही कंपन्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

विचार, मूल्य साखळी, समूह भावना आणि परिसराची परिस्थिती या सर्वांचा सखोल अभ्यास करून उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन या तिन्ही घटकांमध्ये शाश्वत, नफ्याची आणि आत्मनिर्भर मूल्य साखळी उभारणारी शेतकऱ्यांसमोर नव्या संधींचा मार्ग मोकळा करणारी चंद्रपूर जिह्यातील राजुरा येथील ‘कृषक स्वराज’ ही शेतकरी उत्पादक कंपनी उभी राहिली असून तिची वाटचाल अत्यंत उल्लेखनीय आहे. ‘कृषक स्वराज’च्या विविध उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पन्न वाढवण्याची संधी मिळत नाही, तर त्यांचा आर्थिक आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठाही दृढ होत आहे.
देशभरात मिरचीचे उत्पादन होत असले तरी भावातील चढ-उतार, व्यापाऱ्यांचा दबाव, नफा कमी होणे आणि प्रक्रिया सुविधांचा अभाव या समस्यांना शेतकऱ्यांना कायम सामोरे जावे लागते. हीच समस्या ओळखून ‘कृषक स्वराज’ने शेतकऱ्यांना एकत्र आणून मिरची पिकावर आधारित ‘रोपांपासून ते निर्यातीपर्यंत’ संपूर्ण मूल्य साखळीचा एकात्मिक प्रकल्प विकसित केला आहे. शेतकरी फक्त उत्पादनकर्ता न राहता विक्रेतादेखील बनला पाहिजे, या उद्देशाने हे कार्य सुरू करण्यात आले.

या प्रवासाची सुरुवात सतीश गिरसावळे आणि त्याला साथ देणाऱ्या समविचारी शेतकरी मित्रांनी केली. सतीश हा मूळचा राजुरा तालुक्यातील पंछाळा गावचा. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, पण नंतर समाजकारणाकडे वळला. डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेशी संपर्क आणि ‘निर्माण’ फेलोशिपमधील अनुभव यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, शेतकऱ्यांच्या अडचणींवर फक्त चर्चा करून उपयोग नाही. त्यावर दूरगामी परिणाम करणारा उपाय करायला हवा. देशाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांमधून प्रेरित होऊन त्यांनी ‘कृषक स्वराज’ या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. ‘कृषक स्वराज’ची मूळ कल्पना पाच मूल्यांवर आधारित आहे. मूल्याधार, कालाधार, कार्याधार, ज्ञानाधार आणि जनाधार. या तत्त्वांमुळे संस्थेचा पाया भक्कम झाला असून प्रत्येक निर्णय ‘शेती’ केंद्रस्थानी ठेवून घेतला गेला.

लागवडपूर्व ते काढणीपश्चात प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक आणि शास्त्रीय मदतीची गरज ओळखून ‘कृषक स्वराज’ने कृषी सुविधा केंद्राची उभारणी केली आहे. या केंद्रामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खतं, औषधे, सिंचन साहित्य आणि तज्ञांचा सल्ला हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. डिजिटल नोंदवहीच्या माध्यमातून उत्पादन क्षमतेचा आणि पीक पद्धतीचा डेटा गोळा केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे परिणाम स्पष्टपणे दिसतात. शेतकरी उत्पादक कंपनी जर फक्त उत्पादनावर अवलंबून राहिल्यास नफा मर्यादित राहू शकतो हे ओळखून ‘कृषक स्वराज’ने मिरचीसाठी डिहायड्रेशन आणि पावडर प्रोसेसिंग युनिट उभारले. या माध्यमातून कच्च्या मिरचीचे रूपांतर सुकी मिरची आणि मिरची पावडरमध्ये केले जाते. परिणामी शेतकऱ्यांचा नफा दुप्पट होतो, तर स्थानिक रोजगारही निर्माण होतो.

विक्रीतील उत्पन्नाचा ठरावीक भाग शेतकऱ्यांना वेळेवर दिला जातो आणि उर्वरित रक्कम वर्षाअखेर नफ्यातील वाटा म्हणून परत केली जाते. या प्रक्रियेमुळे शेतकरी केवळ ग्राहक न राहता सहभागी भागीदार म्हणून जोडला जातो. या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे ते शाश्वत शेती आणि बाजारातील स्पर्धा दोन्हींचा समतोल साधते. उत्पादनासाठी स्थानिक जातींचा वापर, जैविक खतांचा समावेश, पाण्याचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन आणि स्थानिक संसाधनांचा वापर या गोष्टींवर संस्थेने विशेष भर दिला आहे. या उपक्रमाचा परिणाम फक्त आर्थिक पातळीवर नाही, तर सामाजिकदृष्ट्यादेखील महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सरासरी 30-40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तरुणांनी शेतीकडे परत वळण्यास सुरुवात केली आहे. गावात महिलांसाठी पॅकिंग आणि गुणवत्ता तपासणी केंद्रांमध्ये रोजगार निर्माण झाला आहे. ‘शेती फक्त नशिबावर नाही, तर ती योग्य नियोजनावर चालते’ या विचाराचा प्रत्यक्ष पुरावा ‘कृषक स्वराज’ने दिला आहे. मिरचीसारख्या नगदी पिकांपासून हळद, कांदा आणि इतर पिकांपर्यंत यासारखी मूल्य साखळी उभारता येऊ शकते. प्रत्येक पिकासाठी ‘शेतीपूर्व-शेतीपश्चात-बाजार’ या त्रिसूत्रीवर आधारित योजना तयार केल्यास शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खऱया अर्थाने बदलू शकते. ‘कृषक स्वराज’चे हे मॉडेल दाखवते की, आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय दृष्टिकोन आणि बाजाराशी थेट जोडलेली योजना यांचा संगम ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवू शकते. ‘कृषक स्वराज’चा प्रवास हे केवळ एका कंपनीचे यश नाही, तर शेतीत स्वावलंबन आणि ज्ञानाधारित व्यवस्थापनाचे उदाहरण आहे.

(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)