
<<< सुधाकर वसईकर
पिवळं चमकदार, कसदार, बावनकशी सोन्याचं सगळ्यांनाच आकर्षण असतं. गुंज गुंज सोनं जमा करून एखादा मोठा दागिना घडविता आला म्हणजे जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते. मात्र ऐहिक सुखापलीकडेही एक जग असतं. जगण्यातील भावनिक गुंतवणूक तोलामोलाची असते. ज्याची पैशात मोजदाद करता येत नाही. काही आठवणी अनमोल असतात. ज्या मनात कायम घर करून असतात. मानवी जीवनातील सोनेरी आठवणींचा परतावा पैशात मिळत नसेलही; पण समाधान मात्र कैकपटीने मिळते. त्या जीवनाला सुखकर करतात. मनाला हळवं करून सोडतात. मीनाक्षी ठाकरे यांनी आपले पती भीमराज यांच्या न संपणाऱ्या, कायम स्मरणात राहणाऱ्या सोनेरी आठवणींना, आपल्या पहिल्या वहिल्या ‘बावनकशी आठवणी’ ह्या पुस्तकात सुवर्णमयी उजाळा दिला आहे.
मीनाक्षी ठाकरे यांनी हे पुस्तक पती भीमराज यांना अर्पण केले आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत त्या म्हणतात की भीमराज यांचे ब्रीदवाक्य होते, ‘प्रयत्न आणि त्यासाठी अविरत संघर्ष’ आणि या प्रेरणेतूनच मीनाक्षी ठाकरे यांचे पुस्तक आकारास आले. प्रस्तुत पुस्तकात एकूण 37 लेख आहेत. प्रसंग, लेख आणि ललित लेख अशी लेखांची विभागणी केली आहे. ‘क्रिकेट’ या प्रासंगिक लेखात पूर्वी खेळले जाणारे खेळ, जुन्या सायकलचा टायर फिरविणे, काचेच्या गोट्यांचा डाव झाडाखाली मांडणे, अवकाळी पावसात अर्धओल्या भुसभुशीत जमिनीत लोखंडी सळई खुपसा खुपसीचा खेळ आदि खेळांचे वर्णन साठी-सत्तरीत असलेल्या पिढीला आपल्या बालपणात घेऊन जाणारे आहे. लेखांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, यात छोटे छोटे ट्विस्ट असल्याने हे 17 प्रासंगिक लेख रंजक तर झाले आहेतच; तितकेच बोधप्रदही आहेत. त्यासाठी ते मुळातून वाचायला हवेत.
लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मीनाक्षी ठाकरे यांचा मराठी साहित्यातील लेखनाचा सुरु झालेला प्रवास निश्चितच स्पृहणीय आहे. त्यांचं पहिलंच पुस्तक असलं तरी लेखनात कुठेही नवखेपण जाणवत नाही. साध्या-सोप्या भाषेतून त्यांनी काही प्रसंग छान रंगवले आहेत. ते मन रिझविणारे आहेत. ओघवती भाषा शैली आहे. त्यामुळे सगळे लेख वाचनीय झाले आहेत. जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची सविस्तर सुंदर प्रस्तावना लाभली आहे. आणि पाठराखणही त्यांनीच केली आहे.
बावनकशी आठवणी
लेखिका ः मीनाक्षी भीमराज ठाकरे पृष्ठे ः 120
मूल्य ः 200/- प्रकाशक ः अष्टगंध प्रकाशन