
कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात जोशी मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलासा दिला. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अटकेला मनाई करतानाच न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले.
कृष्ण जन्मभूमी निर्माण ट्रस्टचे आशुतोष ब्रह्मचारी यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात बाल लैंगिक शोषणाचे आरोप करत त्यांच्यावर पोक्सो कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आज या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वकिलाने या प्रकरणात शोषण झाल्याचा आरोप करण्यात आलेली लहान मुले कुठे आहेत? त्यांना अद्याप बालकल्याण समितीकडे का सोपवण्यात आले नाही, असे प्रश्नही वकिलाने उपस्थित केले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अविमुक्तेश्वरानंद यांच्या अटकेस मनाई केली.
काँग्रेसकडून हवन
दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसने अविमुत्तेश्वरानंद यांच्या समर्थनार्थ तसेच उत्तर प्रदेश सरकारला शहाणपण यावे, यासाठी हवन केले. भोपाळमधील रेड क्रॉस स्क्वेअर येथील हनुमान मंदिरात हा हवन विधी करण्यात आला.


























































