
ठाण्यात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट सुरू असून आता तर विकासकाने पर्यावरणावरच घाव घातला आहे. वर्तकनगर प्रभाग समिती हद्दीतील टिकुजीनीवाडी येथील महादेव मंदिराजवळील भूखंडावरील 26 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने संबंधित ठेकेदार व विकासकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याजवळ असलेल्या मानपाडा येथील टिकुजीनीवाडी परिसरात वृक्षांची तोड होत असल्याची माहिती उद्यान निरीक्षक डॉ. राहुल दुरगुडे यांनी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला दिली. या माहितीच्या आधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी गेले असता जेसीबीच्या सहाय्याने वृक्षतोड सुरू होती. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्याला काम थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांच्याकडे वृक्षतोडीबाबत परवाना आहे का, याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही परवानगी घेतल्याचे आढळून आले नाही. एकूण २६ वृक्षांची तोड करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

























































