आयुष उपांत्यपूर्व फेरीत सिंधू, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निगंबो (चीन), दि. 9 (वृत्तसंस्था) – हिंदुस्थानचा युवा खेळाडू आयुष शेट्टीने झुंजार खेळाचे प्रदर्शन करीत बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मात्र, पी.व्ही. सिंधू व एचएस प्रणॉय या स्टार खेळाडूंचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

जागतिक क्रमवारीत 25व्या स्थानावर असलेल्या आयुष शेट्टीने 20व्या मानांकित चायनीज तायपेईच्या चि यू जेन याचा 21-16, 21-12 असा सरळ सेटमध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ तिसऱया मानांकित इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी याच्याशी पडणार आहे.

मात्र, हिंदुस्थानची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला चीनच्या दुसऱया मानांकित वांग झियी हिने 46 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-18, 21-8 अशा फरकाने हरवले. दुखापतीतून पुनरागमन करणाऱया प्रणॉयलाही चीनच्या वेंग होंग यांगकडून 21-12, 21-19 असा पराभव पत्करावा लागला.

मिश्र दुहेरीतही निराशा

मिश्र दुहेरी गटात ध्रुव कपिला आणि तनीषा क्रास्टो या जोडीला मलेशियाच्या चौथ्या मानांकित चेन तांग जी आणि तो ई वेइ या जोडीकडून 21-13, 21-14 असा पराभव स्वीकारावा लागला. एकूणच, आयुष शेट्टीच्या दमदार कामगिरीमुळे हिंदुस्थानचे आव्हान जिवंत राहिले असले तरी, इतर प्रमुख खेळाडूंच्या पराभवामुळे भारताला धक्का बसला आहे.