
भोंदू अशोक खरातचे धक्कादायक कारनामे उघड होत आहेत. ‘तू अप्सरा आहेस’, अशी भूरळ घालून महिलेवर अत्याचार केला, औषध देवून तिचा गर्भपात केल्याचे तपासात समोर आले आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारी पुन्हा ८ एप्रिलपर्यंत सात दिवसांची एसआयटी कोठडी दिली आहे.
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांवर भोंदूबाबा अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केले आहेत. सुरुवातीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. दुसर्या गुन्ह्यात विशेष तपासी पथकाने त्याला ताब्यात घेतले, गुरुवारी न्यायालयात हजर केले. सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या काळ्या कृत्याचा पाढा वाचला. ‘तू अप्सरा आहेस’ असे त्याने त्याच्याकडे आलेल्या महिलेला सांगून जाळ्यात ओढले, लैंगिक अत्याचार करून गर्भवती ठेवले. समाजात बदनामी करीन, अशी भीती घालून गोळ्या, औषधे देवून तिचा गर्भपात केला. त्याला यात कोणी सहकार्य केले, आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घ्यायचा आहे. तो मास्टरमाईंड असून, तपासात सहकार्य करीत नसल्याने कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सात दिवसांची ८ एप्रिलपर्यंत एसआयटी कोठडी दिली. या पीडितेच्या नातेवाईकांकडून त्याने आधार, पॅनकार्डची मागणी कशासाठी केली होती, याचा शोध घ्यायचा आहे.
‘व्हीसी’द्वारे हजर
जनक्षोभ आणि जीविताला होणारा संभाव्य धोका लक्षात घेवून न्यायालयाच्या परवानगीने खरातला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयात यासाठी चार स्क्रिन लावण्यात आले होते. पिंक टी-शर्ट घातलेल्या खरातने आपले काही म्हणणे नसल्याचे सांगितले. तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात खरातविरुद्ध म्हणणे मांडले.
फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस
शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणी खरातची पत्नी कल्पना हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे, ती फरार असून, शोध सुरू आहे. ती परदेशात पळून जावू नये, यासाठी तिच्याविरुद्ध शिर्डी पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

























































