
राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे येथे त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी केली आहे.
शरद पवार यांनी याबाबत ट्विट करत सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. ”राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो”, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
शनिवारी रात्री झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पुर्वेकडील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला. तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्यावर तिघांनी हल्ला केला असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक जण उत्तर प्रदेशचा असून दुसरा हरयाणाचा असून तिसरा आरोपी फरार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.