
पूर्वी घेतलेल्या गायरान जमिनीमधील पाच एकर, अतिक्रमण केलेली एक एकर आणि आता शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस कागदपत्रे, दबावतंत्राचा वापर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल करून आणखी 33.36 गुंठे क्षेत्र मालकी हक्काने, तसेच 266.34 चौरस मीटर क्षेत्र भाडेपट्टय़ावर घेऊन वठार तर्फ वडगाव येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप (ता. हातकणंगले) या संस्थेने सरकारी जमीन लाटल्याचा आरोप वठार तर्फ वडगाव ग्रामपंचायतचे सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच अश्विनी कुंभार आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
याप्रकरणी तत्काळ चौकशी करून आदेश रद्द करावा, लाटलेली जागा पूर्ववत ‘गायरान’ घोषित करून संबंधित संस्थेवर कडक कारवाई करावी; अन्यथा येत्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर या शिक्षण संस्थेविरोधात साखळी उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला. वठार तर्फ वडगावमधील गायरानमधील गट क्र. 113 ‘अ’ क्षेत्रात श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला काही वर्षांपूर्वी पाच एकर जागा दिली होती. त्यावर त्यांनी व्यावसायिक शिक्षण संस्था सुरू केली. त्यानंतर आणखी एक एकर जागेवर अतिक्रमण केले. दरम्यान, या शिक्षण संस्थेने आणखी काही गुंठे जागा शासनाकडून मालकी हक्काने आणि क्रीडांगणासाठी 30 वर्षे भाडेपट्टय़ाने बोगस कागदपत्राद्वारे ताब्यात घेतल्याचे समोर आले. याबाबत 28 जुलै 2025 रोजी विशेष ग्रामसभेत जमीन बचाव कृती समिती स्थापन करून बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ यांचे सात-बारा पत्रकावर नाव लागल्याने, तसेच प्रशासनाचा मनमानी, बोगस व ढिसाळ कारभार यावर चर्चा करून जाहीर निषेध करण्यात आला.
या शिक्षण संस्थेच्या वतीने गट नंबर 113 ‘ब’ क्षेत्रातील सरकारी हक्कातील सुमारे साडेसात एकर जमीन मालकी हक्क आणि भाडेपट्टा कराराने घेतली असून, त्यासाठी बोगस कागदपत्रांचा वापर झाला. तसेच दबावतंत्राचा, तसेच शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वीही गायरानाची जागा त्यांनी घेतली आहे. त्यामध्ये अटी आणि शर्तींचा भंग झाला आहे. आता तर 30 वर्षे भाडेकराराने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन दिल्याचा आरोप करीत, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भूखंड वा जागा मागणीचे अर्ज केलेल्या इतर संस्थांचा विचार न करता, अवघ्या 20 दिवसांत या शिक्षण संस्थेकडे जागा हस्तांतरित केल्याचे निदर्शनास आणून देत, नियम व अटींचा भंग केल्याप्रकरणी एका संस्थेवर कारवाई केली. मग आता त्याच नियम व अटींचा भंग करणाऱया या शिक्षण संस्थेवर का कारवाई केली जात नाही?
स्वातंत्र्यदिनापासून संस्थेविरोधात साखळी उपोषण
याप्रकरणी निर्णय न झाल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याचा इशाराही सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच अश्विनी कुंभार यांनी दिला. यावेळी राजहंस भूजिंगे, सुहास पाटील, राहुल पवार, सचिन कुंभार, रेश्मा शिंदे, रुक्साना नदाफ, विनायक पाटील, शरद सांबारे आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.