कल्याणमध्ये शिवसेनाप्रमुखांचा भव्य पुतळा!

25
balasaheb-thackeray

कोल्हापूर – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कलानगरी अर्थात कोल्हापूरमध्ये घडविलेल्या देशातील पहिल्या २२ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. दीड वर्षाच्या जडणघडणीतून चार टन वजनाचा ब्राँझमध्ये घडविलेला पुतळा आज सकाळी मोठ्या दिमाखात आणि बंदोबस्तात खास वाहनातून मुंबईकडे रवाना करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, धनगरी ढोलताशांचा गजर आणि शिवसेनाप्रमुखांच्या जयघोष करीत शिवसैनिकांसह कोल्हापूरकरांनी परिसर दणाणून सोडला. कोल्हापुर-मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी वाजत-गाजत ग्रामस्थांनी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली.

आज सकाळी ११च्या सुमारास कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृहनेते राजेश मोरे, नगरसेवक सुधीर बासरे, माजी सभागृहनेते सचिन बासरे यांच्यासह येथील जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, जिल्हा उपप्रमुख सुजीत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, रवी जाधव, शहरप्रमुख शिवाजी जाधव आदी पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत खास वाहनातून हा पुतळा मुंबईकडे रवाना झाला. तत्पूर्वी स्थानिक महिलांच्या वतीने पंचारती ओवाळून वाहन आणि शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

लवकरच लोकार्पण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने साकारण्यात येत असलेला हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा काळा तलाव (भगवा तलाव) येथे बसविण्यात येणार आहे. लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

…..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण देशातील पहिलाच पूर्णाकृती पुतळा कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून स्मारकाच्या रूपाने साकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे रुद्राक्षांच्या माळांसह अंगावर लपेटलेली शाल अन् जनतेला अभिवादन करण्यासाठी उंचावलेला हात असे भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेला २२ फुटांचा आणि चार टन वजनाचा हा भव्य पुतळा साकारण्याचे भाग्य शिल्पकार संताजी चौगुले यांच्या रूपाने कोल्हापूरकरांना लाभले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या