
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) एकाच वेळी 12 ठिकाणी भीषण हल्ले केले. त्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलातील 10 कर्मचाऱयांचा मृत्यू झाला, तर बलूच लिबरेशन आर्मीचे 37 हल्लेखोरदेखील ठार झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये हिंदुस्थानचा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे.
सुरक्षा अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, बलूच बंडखोरांनी क्लेट्टा, पसनी, मस्तुंग, नुश्की आणि ग्वादर जिह्यांत शनिवारी सकाळी 12 ठिकाणांवर एकाच वेळी हल्ले केले. सशस्त्र हल्लेखोर या ठिकाणांवर घुसले आणि पोलीस तसेच सैन्याच्या ठिकाणांवर गोळीबार सुरू केला. याशिवाय मोठय़ा प्रमाणावर ग्रेनेडनेदेखील हल्ले करण्यात आले. त्यांच्या स्पह्टांचे आवाज शहरांमध्ये दूर अंतरापर्यंत ऐकू येत होते. त्यात 10 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. क्वेट्टामध्ये 4 पोलिसांचा मृत्यू झाला. याशिवाय बंडखोरांनी नुश्की जिह्यातील एका पोलीस उपायुक्ताचे अपहरण केले आहे. ठार झालेल्या पोलिसांचा 10 सुरक्षा रक्षकांमध्ये समावेश आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बलूच बंडखोरांनी क्वेट्टा शहरातील फैसल बँकेचा ताबा घेतला आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तू लुटून नेल्या.
‘बीएलए’ने क्वेट्टातील बाजार घेतला ताब्यात
बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. संघटनेने म्हटले की, सैन्याची ठिकाणे, पोलीस आणि प्रशासनिक अधिकाऱयांना बीएलएच्या बंडखोरांनी लक्ष्य केले. सैन्याच्या कारवाईत अडथळा निर्माण व्हावा, यासाठी मुख्य महामार्ग बंद करण्यात आले. तसेच क्वेट्टातील एक बाजार ताब्यात घेतल्याचा दावाही बीएलएने केला.
पाकिस्तानी पंतप्रधान बरळले
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हे हल्ले निष्प्रभ केल्याचा दावा केला. त्याच वेळी त्यांनी हिंदुस्थानविरोधात गरळ ओकण्याची संधी सोडली नाही. या हल्ल्यांमध्ये हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप शरीफ यांनी केला.
























































