Balochistan Militants Attacks: बलुचिस्तानमधील हल्ल्यामागे दोन महिलांचा हात; BLA कडून फोटो जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या भीषण हिंसाचाराची परिस्थिती हाताबाहेर गेली असून ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने बलुचिस्तान प्रांतातील अनेक शहरांमध्ये एकाच वेळी मोठे आत्मघातकी हल्ले केले.या हल्ल्यांमध्ये सुमारे सुरक्षा दलाचे 17 जवान आणि 31 सामान्य नागरिकांसह एकूण 50 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांनंतर, बीएलएने दोन हल्लेखोरांचे फोटो जाहीर केले आहेत.यामध्ये दोन्ही महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

बीएलएच्या म्हणण्यानुसार, या दोन महिलांपैकी आसिफा मेंगल (24) असे एका महिलेचे नाव आहे. आसिफा बलुचिस्तानच्या नोश्की भागातील रहिवासी तिचा जन्म 2 ऑक्टोबर 2002 रोजी झाला असून ती तिच्या 21 व्या वाढदिवशी बीएलएच्या मजीद ब्रिगेडमध्ये सामील झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. यानंतर जानेवारी 2024 मध्ये तिने आत्मघाती बॉम्ब बनण्याचा निर्णय घेतला.

बीएलएने दिलेल्या माहितीनुसार, आसिफाने नोश्की येथील आयएसआय मुख्यालयावर हल्ला केला. दरम्यान दुसऱ्या महिला हल्लेखोराचे नाव अद्याप समोर आलेले नाही. हल्ल्यापूर्वी ती तिच्या साथीदारांसोबत असतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानी सरकारवर टीका करताना दिसत आहे.

पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्यांनंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांच्या मते, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल 145 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही सांगितले की या हल्ल्यांमध्ये महिला हल्लेखोरांचा सहभाग होता. हल्लेखोरांनी नागरिकांच्या वेशात शाळा, बाजारपेठा, बँका आणि रुग्णालयांमध्ये प्रवेश केला आणि गोळीबार केला. क्वेटा, ग्वादर, मस्तुंग आणि नोश्की यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे हल्ले करण्यात आले.

दहशतवाद पोसणे पाकिस्तानच्या अंगाशी; बलुचिस्तानमध्ये हिंसाचार, 50 जणांचा मृत्यू, तर 145 अतिरेक्यांचा खात्मा केल्याचा दावा