विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी दुष्परिणाम ॲप्सवर बंदी घाला; आमदार प्रवीण स्वामींची विधानसभेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला स्क्रीन टाइम आणि त्याचे होणारे दुष्परिणाम ही अत्यंत गंभीर बाब असून, मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम करणाऱ्या मोबाइल ॲप्सवर सरकारने तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करताना त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

सायबर गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणात सायबर क्राईमच्या वाढत्या प्रमाणाबद्दलही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “आजच्या काळात सायबर गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून त्याचे प्रमाण चिंताजनक आहे. सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने योग्य आणि कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.” सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

पोलीस भरती आणि वाहतूक व्यवस्थेवर भर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि वाहनांच्या संख्येनुसार वाहतूक पोलीस तसेच पोलीस अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी तातडीने पोलीस भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.