किस्से आणि बरंच काही- बंगळुरू ते मुंबई

>> धनंजय साठे

सेल्स क्षेत्रात काम करताना अचानक एंटरटेन्मेंट क्षेत्राचा भाग बनलो. थेट नीना गुप्ता यांच्यासह कार्यकारी निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा प्रवास आजपर्यंत सुखद ठरला.

साल 1990. पदवीधर होऊन माझी पहिली नोकरी सुरू झाली होती. यूपीएस सिस्टीम बनवणाऱया कंपनीचं उत्पादनं विकण्याचं काम मिळालं होतं, जे मी हळूहळू एन्जॉय करायला लागलो होतो. त्या काळात मी बऱयापैकी मुखदुर्बळ असल्यामुळे मला नोकरी कशी मिळाली याचा माझ्या आईला प्रश्न पडला होता. त्यात ती नोकरी होती सेल्समधली, मग माझा टिकाव कसा लागणार? पण तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमा उरली नव्हती, जेव्हा फक्त सहा महिन्यांतच उत्तम कामगिरीवर खुश होऊन माझ्या वरिष्ठांनी मला आणि तीन इतर सहकाऱयांना पदोन्नती देऊन चेन्नईची ब्रँच सांभाळायला आम्हाला चेन्नईला पाठवलं होतं. बंगळुरूमध्ये कन्नड भाषेत शिक्षण झाल्यामुळे कन्नड लिहिता, वाचता, बोलता येत होतीच, पण चेन्नईमधल्या तामीळ भाषेचा गंध नव्हता. तरीही आम्ही तिथे तरलो आणि उत्तमरीत्या काम केलं.

त्या काळात मी ‘महाराष्ट्र मंडळ बंगळुरू’चा सचिव होतो. क्रीडा, कला, नाटक, एकांकिका… सर्व आघाडय़ांवर माझी आगेकूच असायची. यूपीएसच्या नोकरीनंतर मी ‘दलाल स्ट्रीट जर्नल’च्या सॉफ्टवेअर मार्केटिंग कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदावर काम सुरू केलं. त्यानिमित्ताने मी मुंबईला आलो. त्यामुळे माझ्या बायकोशी भेट झाली. तिच्या नोकरीमुळे तिचं बंगळुरूला स्थलांतर कठीण होतं. म्हणून ज्या शहरात लहानाचा मोठा झालो होतो ते शहर सोडून मी मुंबई गाठली.

मुंबईत काही काळानंतर `ask me information’ नावाच्या कंपनीत मी डिव्हिजनल सेल्स मॅनेजर म्हणून काम सुरू केलं. काही वर्षांनी ‘जस्ट डायल सर्व्हिसेस’मध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम केलं. या सगळ्या कंपन्यांमध्ये काम करताना गाणी गाणं, नकला करणं असे करमणुकीचे कार्यक्रम करण्यासाठी मी प्रसिद्ध होतो. ही पार्श्वभूमी पुढे मला फायद्याची ठरली.

‘जस्ट डायल’मध्ये असताना एक दिवस माझ्या टीममधल्या एकाबरोबर लोकल ट्रेनने प्रवास करत होतो. दुपारची वेळ होती. त्या दिवशी बुधवार होता. मी माझ्या सहकाऱयाला सांगितलं की, “अंधेरीला एका मीटिंगसाठी जायचंय. जर मला डुलकी लागली तर विलेपार्ले आलं की, उठव.’’ मी डोळे बंद करून बसून होतो. थोडय़ा वेळाने त्याने मला उठवलं. मी जरा चिडूनच म्हणालो, “अरे, थोडा आराम करू दे.’’ तर त्याने वर्तमानपत्रातली एक जाहिरात दाखवली. त्या वेळी दर बुधवारी एका इंग्रजी पेपरमध्ये नोकरीच्या जाहिराती यायच्या. जाहिरातीत कंपनीचं नाव नव्हतं. कार्यकारी निर्मात्याची गरज आणि कंपनीचा पत्ता होता. माझ्यापेक्षा माझ्या सहकाऱयाची इच्छा होती की, मी त्या वॉक-इन-इंटरव्हय़ूसाठी जाऊन प्रयत्न करावा. मी त्याला म्हणालो, ‘माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. निर्माता वगैरे बनण्याची स्वप्नं का बघावीत?’ पण तो ऐकायलाच तयार नव्हता. सरतेशेवटी मी त्याच्या आग्रहाखातर 235 नंबरची बस घेऊन मुलाखतीसाठी गेलो. बसचा नंबर विसरू शकत नाही. कारण ती मला नव्या प्रवासाच्या दिशेने घेऊन निघाली होती. त्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं. ते ऑफिस होतं सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका-निर्माती नीना गुप्ता यांचं.

मी कॉर्पोरेट क्षेत्रात असल्याने फॉर्मल शर्ट-टाय घालून गेलो होतो. त्या वेळी दोन क्षेत्रांतल्या पेहरावातला फरक पटकन लक्षात आला. नीना गुप्ता यांना प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर ‘खानदान’, ‘जाने भी दो यारो’, ‘उत्सव’, ‘चोली के पीछे गाणं’… आठवलं. दीर्घ श्वास घेत मी नीनाजी आणि त्यांचे पार्टनर अनुपम यांना या क्षेत्रात मला अनुभव नसल्याचं प्रांजळपणे सांगत संधी दिल्यास सोनं करेन, असं म्हणालो.

तोपर्यंत बाहेर माझा सहकारी उतावीळ झाला होता. त्याला वाटलं की, सर इतका वेळ आत आहेत म्हणजे नोकरी कन्फर्म! पण मला नोकरीची आशा नव्हती. तो मात्र मिळणार यावर ठाम होता आणि त्याच रात्री मला नीना गुप्तांच्या ऑफिसमधून फोन आला, उद्या दुपारी भेटायला बोलावलंय.

दुसऱया दिवशी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. देवाचं नाव घेत केबिनचा दरवाजा ढकलत आत गेलो. त्याच्या चेहऱयावर स्मितहास्य होतं. हात पुढे सरसावत उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “वेलकम टू अवर वर्क प्लेस, कब से जॉईन करोगे?’’… आणि एंटरटेन्मेंट क्षेत्राचा भाग बनलो. हा प्रवास आजपर्यंत सुखद ठरला आहे. यापुढेही निरंतर राहो हीच देवाकडे प्रार्थना.

[email protected]