उस्मान हादी यांचा खून करणारे हिंदुस्थानात पळून गेले, ढाका पोलिसांचा दावा

बांगलादेशातील राजकीय कार्यकर्ते उस्मान हादी यांच्या खुनप्रकरणातील दोन प्रमुख संशयित खुनानंतर मेघालय सीमेवरून हिंदुस्थानात पळून गेले असा दावा ढाका पोलिसांनी केला आहे. द डेली स्टारच्या वृत्तानुसार ढाका महानगर पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त एस. एन. नजरुल इस्लाम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फैसल करीम मसूद आणि आलमगीर शेख अशी संशयितांची नावे असून स्थानिक मदतनीसांच्या मदतीने मयमनसिंह जिल्ह्यातील हलुआघाट सीमारेषेतून त्यांनी हिंदुस्थानात प्रवेश केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हिंदुस्थानात प्रवेश केल्यानंतर ‘पूर्ती’ नावाच्या व्यक्तीने त्यांना स्वीकारले आणि नंतर ‘सामी’ नावाच्या टॅक्सीचालकाने त्यांना मेघालयातील तुरा शहरात पोहोचवले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

नजरुल इस्लाम यांनी सांगितले की या दोघांना मदत करणाऱ्या व्यक्तींना हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याच्या अनौपचारिक माहिती मिळाल्या आहेत आणि या प्रकरणात अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे. संशयितांच्या अटकेसाठी आणि प्रत्यर्पणासाठी बांगलादेश सरकार भारतीय अधिकाऱ्यांशी औपचारिक तसेच अनौपचारिक मार्गाने संपर्कात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संशयितांना भारतातून परत आणण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सातत्याने संपर्क सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

12 डिसेंबर रोजी ढाक्यात मुखवटे घातलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून हादी यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सिंगापूर येथे हलवण्यात आले; मात्र सहा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येनंतर ढाका आणि इतर भागात व्यापक हिंसाचार उसळला. ढाक्यात दोन वृत्तपत्रांच्या कार्यालयांना तसेच ‘छायानट’ आणि ‘उदिची’ या सांस्कृतिक संस्थांना जमावाने आग लावल्याच्या घटना घडल्या. मध्य बांगलादेशातही असंतोष पसरला आणि मयमनसिंह येथे एका हिंदू कारखान्यातील कामगाराची जमावाने झालेल्या हल्ल्यात हत्या केल्याची घटना घडली, ज्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली.