
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत मालिका खिशात घातली आहे. रविवारी (15 मार्च 2026) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानाचा धुव्वा उडवला आणि सामन्यासह मालिकाही जिंकली. पाकिस्तानच्या या पराभवामुळे माजी खेळाडू अहमद शहजाद खवळला आहे. त्याने कर्णधार शाहीन अफरीदी आणि प्रशिक्षक माइक हेसन यांना फटकारलं आहे. तसेच आता लोक पाकिस्तानकडे झिम्बाब्वेच्या नजरेने पाहू लागले आहेत, असे खळबळजनक विधान त्याने केले आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा खेळ निराशाजनक राहिला होता. तसेचा आता बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालकेतही पराभवाचा सामना संघाला करावा लागला आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानावर चहूबाजून टीका होत असून माजी खेळाडू संघावर आणि निवडकर्त्यांवर भडकलेले दिसत आहेत. पाकिस्तानाच माजी खेळाडू अहमद शहजाद याने आपल्या युट्यूब चॅनलवर संघासह मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीवर सडकून टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाकिस्तानी क्रिकेटच्या सध्याच्या परिस्थितीवर त्याने प्रश्चचिन्ह निर्माण केले आहे. अहमद शहजादने या पराभवाचे खापर प्रामुख्याने वनडे कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि प्रशिक्षक माइक हेसन यांच्यावर फोडले आहे. तो म्हणाला की, संपूर्ण व्यवस्थापन केवळ बहाणे शोधण्यात मग्न आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील मानहानीकारक कामगिरीनंतरही संघात कोणतेही ठोस बदल करण्यात आले नाहीत. मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ वेळ मारून नेण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्याने यावेळी केला.
संघात अचानक तरुण खेळाडूंना स्थान देण्याच्या निर्णयावरही शहजादने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मालिका हरल्यानंतर आता तरुण खेळाडूंना संधी दिल्याचे कारण पुढे करून पराभवाचे समर्थन केले जात आहे, जे चुकीचे आहे. “नेट रन रेटमुळे आपण वर्ल्ड कपमधून बाहेर पडलो, तरीही कोणाला स्वतःची चूक मान्य नाही. थोडी तरी लाज बाळगा,” अशा कडक शब्दांत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि टीम मॅनेजमेंटला सुनावले आहे.

























































