बांगलादेशात हिंसाचार सुरुच; सुप्रसिद्ध रॉकस्टार ‘जेम्स’च्या कॉन्सर्टमध्ये राडा, दगडफेकीत 25 जखमी

बांगलादेशमध्ये कट्टरपंथियांचा उन्माद सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. एका तरुणाला तर जमावाने मरेपर्यंत मारहाण करत झाडाला लटकवून पेटवून दिले होते. अशातच कट्टरपंथी जमावाने सुप्रसिद्ध रॉकस्टार जेम्स यांच्या संगीत कार्यक्रमावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत आणि हाणामारीत 25 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींमधील बहुतांश विद्यार्थी असून हिंसाचारामुळे संगीत कार्यक्रमही रद्द करावा लागला.

बांगलादेशातील सर्वात मोठे रॉस्टार जेम्स (नगर बाउल) हे फरीपूर जिल्हा शाळेच्या 185 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात गायन करणार होते. दोन दिवसीय वर्धापन दिनाचा समारोप जेम्स यांच्या भव्य कॉन्सर्टने होणार होता. शुक्रवारी साडे नऊच्या सुमारास हा कार्यक्रम सुरू होणार होता. या सोहळ्यासाठी हजारो आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शाळेच्या आवारामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले .

कट्टरपंथियांनी कार्यक्रमस्थळी घुसून गोंधळ घातला. हल्लेखोरांनी तुफान दगडफेक केली. एवढेच नाही तर कार्यक्रमस्थळी खुर्च्या, टेबल, साऊंड याचीही तोडफोड करत कार्यक्रमाला उपस्थितांना मारहाण केली. यात 25 विद्यार्थी जखमी झाले. या घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमस्थळी काही अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केला. स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीत आणि नंतर दगडफेकीत झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहताच जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप केला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास आयोजक समितीचे सदस्य . मुस्तफिजुर रहमान शमीम यांनी मंचावरून कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.