बांगलादेशात सत्तापालटानंतर दीड वर्षांनी होणार निवडणुका, मोहम्मद युनूस यांची घोषणा

बांगलादेशातील हंगामी सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपूर्वी बांगलादेशमध्ये संसदीय निवडणुका होतील, अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल.

मोहम्मद युनूस यांनी ही घोषणा करताना राष्ट्रीय एकमत आयोगाने दिलेल्या दोन शिफारशींचा उल्लेख केला. जुलै महिन्यातील राष्ट्रीय चार्टरची अंमलबजावणी करण्यासाठी हे प्रस्ताव आहेत. पहिल्या शिफारशीनुसार, विशेष आदेशांद्वारे घटनात्मक सुधारणा करून त्यावर जनमत घेण्यात येईल. संसदीय निवडणुका आणि जनमत एकाच दिवशी घेण्यात येतील. जनमताने सुधारणा मंजूर झाल्यास, नवीन संसद घटना सुधार परिषद स्थापन करेल आणि २७० दिवसांत सुधारणा पूर्ण करेल. अन्यथा प्रस्तावित सुधारणा आपोआप घटनेत समाविष्ट होतील. दुसऱ्या शिफारशीनुसार, सुधारणा २७० दिवसांत पूर्ण कराव्या लागतील.