
हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा विरोधी असलेला बांगलादेशचा विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी प्रचंड हैदोस घातला. बॅरिकेड्स तोडून शेकडो लोकांनी बांगलादेशच्या संसदेत शिरून तोडपह्ड केली आणि तेथील अनेक वस्तू लटून नेल्या. याशिवाय दंगेखोरांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते बिलाल हुसैन यांचे घर पेटवून दिले. त्यात त्यांच्या सात वर्षीय मुलगी आयशा ही जिवंत जळाली. बिलाल यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
हादी याच्या मृत्यूनंतर दंगेखोरांनी इशनिंदेचा बहाणा करून ढाका शहराजवळ दिपूचंद्र दास या हिंदू तरुणाला निर्दयीपणे मारहाण करून जिवंत जाळले होते. त्यानंतर आज बिलाल हुसैन यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. दरवाजा बाहेरून बंद केल्यानंतर त्यांचे घर पेटवून दिले. आयशा हिचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर सलमा आणि सामिया या दोन मुली 50 टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. बिलाल हेदेखील जखमी झाले आहेत. दरम्यान, दिपूचंद्र दास याच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
हादी याचा मृतदेह सिंगापूरमधून शुक्रवारी सायंकाळी बांगलादेशात परत आणण्यात आला. त्यानंतर शनिवारी त्याला बांगलादेशचे कवी काजी नजरुन इस्लाम यांच्या शेजारी दफन करण्यात आले. यावेळी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी हादी याला निरोप देताना एक नायक असे वर्णन केले. हादी याचे कार्य आपण पूर्ण करूया. जोपर्यंत बांगलादेश अस्तित्वात आहे तोपर्यंत हादी बांगलादेशींच्या हृदयात कायम राहाल, असे युनूस यावेळी म्हणाले.
हादीच्या मारेकऱयांना अटक करा
उस्मान हादी याच्या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. अचानक हा जमाव हिंसक झाला आणि त्यांनी संसदेवरच हल्ला केला. हादीच्या मारेकऱयांना लवकरात लवकर अटक करावी आणि आतापर्यंत काय पावले उचलण्यात आली, याची माहिती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


























































