बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. ठिकठिकाणी दुकाने लुटली जात असून सरकारी कार्यालये पेटवण्यात आली आहेत. आरक्षणाच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आता आंदोलकांकडून अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS) ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हल्लांवर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला. त्यामुळे हिंदूंना या हिंसाचाराचा सामना करावा लागतोय. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने बांगलादेशाच्या मुद्द्यावर योग्य ती पावले उचलली पाहिजेत. आमचा विश्वास आहे की सरकार याकडे नक्कीच लक्ष देईल, असे भैय्याजी जोशी म्हणाले.
बांगलादेशातील शेख हसीना सरकार पडल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडला. आता सध्या त्या हिंदुस्थानात आहेत. दरम्यान, बांगलादेशात लष्कराने सत्ता हाती घेतली असून अंतरिम सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बांगलादेशातील आंदोलक विद्यार्थ्यानी नव्या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नावाची मागणी केली होती.