
सीमा सुरक्षा दलाने (BSF) आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. पकडलेल्या घुसखोराला बीएसएफने पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी जम्मू पोलिसांच्या कनाचक पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गजनसू बॉर्डर पोलिस पोस्टकडे (BPP) सुपूर्द केले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की हा तरुण गजनसू परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेच्या अगदी जवळ आढळून आला.
पकडलेल्या तरुणाची ओळख शरीफुल इस्लाम भुईयां (वय 19) अशी झाली असून तो बांगलादेशातील कोमिल्ला जिल्ह्यातील अद्रा परिसराचा रहिवासी आहे. जम्मू–कश्मीर पोलिसांनी सांगितले की त्याची सखोल चौकशी सुरू असून त्याने सीमारेषा कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या मार्गाने ओलांडली याबाबत माहिती घेतली जात आहे तसेच इतर तपशीलांचीही पडताळणी केली जात आहे.
पोलिसांचा आणखी असा दावा आहे की बांगलादेशातून इतक्या लांब जम्मू–कश्मीरपर्यंत तो कसा पोहोचला, त्याला मार्गात कोणाची मदत मिळाली का, याचा तपास केला जात आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध केंद्र सरकारने कारवाईला गती दिली असून विविध राज्यांतून पकडले गेलेले घुसखोर परत बांगलादेशात पाठवण्यात येत आहेत.


























































