
राज्यात अमरावती, सिल्लोड, अकोला, छत्रपती संभाजीनगर शहर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पूसद, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर, परळी या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात बनावट आधार कार्डद्वारे मोठय़ा प्रमाणात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांगलादेशी घुसखोरांनी अशा प्रकारे बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय आहे. तहसील कार्यालयांमधूनच हे रॅकेट चालवण्यात आल्याचा संशय आहे.
राज्यात बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांची बैठक मागील महिन्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयानुसार विलंबित जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रांची फेरतपासणी व प्रमाणपत्र परत घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. राज्यात सर्वत्र आधार कार्डच्या आधारे देण्यात आलेल्या बिलंबित प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश आज महसूल व वन विभागाने जारी केले आहेत.
फरार घोषित करणार
रद्द करण्यात आलेले मूळ जन्म प्रमाणपत्र परत आले नाही अशाची यादी तयार करण्यात यावी. महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सापडत नसलेल्या अर्जदारांची यादी तयार करावी. तहसीलदारांच्या सहकाऱ्याने त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. जे अर्जदार मूळ प्रमाणपत्र घेऊन निघून गेले आहेत त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया स्थानिक पोलीस स्टेशनमार्फत करण्याचे निर्देश महसूल विभागाने दिले आहेत.
अवैध प्रमाणपत्र रद्द होणार
राज्यात अमरावती, सिल्लोड, संभाजीनगर शहर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पुसद, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर, परळी या जिह्यांत बनावट जन्म प्रमाणपत्र वितरित झाल्याचा संशय आहे. मुख्य म्हणजे तहसीलदारांनी जन्म नोंदी घेण्याचे आदेश दिले नसतानाही काही कार्यालयांकडून प्रमाणपत्र जारी केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित महापालिका व नगरपालिकांनी वितरित केलेल्या जन्म नोंदणीची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अवैध प्रमाणपत्र तत्काळ रद्द करण्यात यावी. तसेच पोर्टलवरील त्या प्रमाणपत्रांची नोंदणी त्वरीत रद्द करण्यात येणार आहे.






























































