
अमेरिकेतील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून अमेरिका लोकशाहीपासून दूर जातेय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लोकांचा आवाज दाबत असून त्यांचे सरकार अमेरिका पोखरतेय. अशा कठोर शब्दांत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्या मनमानी धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प सरकार अमेरिकेतील लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना कमकुवत करत असून सरकार चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ओबामा यांनी केला. हंगेरीसारख्या देशांप्रमाणे अमेरिकेचे सरकार वागत असून येथे निवडणुका होतात, परंतु लोकांचा आवाज दाबला जातो. सरकार मनमानी पद्धतीने वागत असून जेथे कायदा आणि लोकशाहीची खरी भावनाच कमकुवत होत आह. अशा मार्गावर अमेरिकेचे सरकार चालत आहे, असेही ते म्हणाले.
लोक सत्याकडे पाठ करतात, त्यामुळे हुकूमशाही फोफावते
लोक सत्याकडे पाठ करतात. त्यांच्या अशा वागण्यामुळेच हुकूमशाही फोफावते. एखादा नेता वारंवार खोटे बोलत असेल किंवा एखादा राष्ट्राध्यक्ष तो निवडणूक हरला नाही तर जिंकला असा दावा करत असेल तर निवडणुकीत घोटाळा झाल्याच्या आरोपांनी काहीच फरक पडत नाही. परंतु, जेव्हा तोच नेता निवडणूक जिंकतो तेव्हा तो घोटाळा अचानक नाहिसा होतो, असे ओबामा म्हणाले. आज अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीसारख्या प्रमुख राजकीय पक्षात हेच घडत आहे, अशी तोफ ओबामा यांनी डागली.