
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार, २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले असून गुरुवारी, २९ जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातच आज सकाळी अस्थी संकलन केल्यानंतर दुपारी बारामतीतील नीरा नदीमध्ये त्यांचे अस्थी विसर्जन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ आणि जय, त्यांची सून, अजित पवार यांचे बंधू, बहिण सुप्रिया सुळे, पुतणे युगेंद्र पवार आणि इतर कुटुंबिय उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून आता अजित पवार गटाची धुरा कोण सांभाळणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचदरम्यान, शनिवारी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अजित पवार गटाच्या विधिमंडळ सदस्यांची उद्या म्हणजेच शनिवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाणार आहे. पक्षाकडून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद रिकामं आहे. ते सुनेत्रा पवार यांच्याद्वारे कसं भरता येईल, याकडे आमचं लक्ष आहे. उद्याची बैठक पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची असून यात विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्यावर एकमत झालं तर, उद्याच शपथविधी देखील होऊ शकतो, असं ही ते म्हणाले आहेत.



























































