गुड न्यूज… बारवी धरण ओसंडून वाहतेय

754

ठाणेकरांचे पाणी टेन्शन खल्लास

दिवाळी झाली की ठाणे जिह्यात पाणीटंचाई सुरू होते. मात्र गेल्या 10 वर्षांतील हे चित्र या वर्षी बदलणार आहे. नोव्हेंबरपासून नियमित 10 टक्के लागू होणारी पाणीकपात या वर्षी मात्र रद्द केली आहे. बारवी धरण ओसंडून वाहात असल्याने जानेवारीपर्यंत ठाणे जिह्यात शटडाऊन न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लघु पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यामुळे किमान दोन महिने जिल्हावासीयांचे पाणीटंचाईचे टेन्शन खल्लास झाले आहे.

उल्हास नदीपात्रात बारवी आणि आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. हे पाणी कल्याण – डोंबिवली महानगरपालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम या विविध प्राधिकरणामार्फत ठाणे जिह्यात पिण्यासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी पुरवतात. स्टेम प्राधिकरण ठाणे आणि भिवंडी या पट्टय़ातही पाणी देते. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबरनाथ, बदलापूर नागरपालिकेसह येथील दोन्ही एमआयडीसींना पाणीपुरवठा केला जातो. उल्हासनगर नगरपालिका, कल्याण – डोंबिवली महापालिकेतील 27 गावांना एमआयडीसी पाणीपुरवठा करते. शिवाय सर्व पंपन्यांना एमआयडीसी पाणी देते. आंध्र आणि बारवी धरणातील पाणी उल्हास नदीत सोडल्यानंतर येथून प्रत्येक यंत्रणा आपल्या वाटय़ाचे पाणी उचलतात.

जानेवारीपर्यंत मुबलक पाणी मिळणार

ठाणे जिह्याची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात लघु पाटबंधारे विभाग बारवी धारणातील पाण्याचा आढावा घेते. जून महिन्यापर्यंत पाणी वापरता यावे यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात 10 टक्के पाणीकपात केली जाते. या वर्षी जूनपासून सलग पाऊस कोसळत असल्याने बारवी धरण फुल्ल भरले आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने नुकतीच सर्व प्राधिकरणाची मिटिंग घेऊन जानेवारीपर्यंत पाणीकपात केली जाणार नाही, असे सांगून सुखद धक्का दिला.
मंजूर कोटय़ापेक्षा अधिक पाणी न उचलण्याची सक्त ताकीद कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम या प्राधिकरणांना दिली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पुन्हा मिटिंग घेऊन पाणीकपात करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

दहा वर्षांत पहिल्यांदाच शटडाऊन मागे
ठाणे जिह्याची लोकसंख्या 30 लाखांच्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवताना लघु पाटबंधारे विभागाची कसरत होते. त्यामुळे सप्टेंबरला पाऊस थांबला की लगेच पुढच्याच महिन्यापासून पाणीकपात लागू करावी लागते. पहिल्या टप्प्यात 10 टक्क्यांपासून लागू होणारी कपात मे महिन्यात 30 टक्क्यांपर्यंत जाते. गेल्या दहा वर्षांपासून या कपातीची नागरिकांना सवयच झाली आहे. या वर्षी पहिल्यांदाच जानेवारीपर्यंत पाणीकपात होणार नाही.

धरणात 93 टक्के साठा
आजघडीला बारवी धरणात 93 टक्के पाणी साठा आहे. धरणाची उंची वाढवल्याचा थेट फायदा आता होत आहे. आजच्या दिवशी गतवर्षी धरणात 200 दशलक्ष घनमीटर पाणी होते. हे प्रमाण 86 टक्के होते. आता धरणात 315 दशलक्ष घनमीटर पाणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या