वर्ल्ड कपसाठी आयपीएलमध्ये ‘हिऱ्यांची शोधमोहीम’, बीसीसीआयच्या निवड समितीची असणार करडी नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वेळी हातातून निसटलेलं आयसीसी वन डे वर्ल्ड कपचं स्वप्न पुन्हा पकडण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेट सज्ज झाले आहे. यावेळी बीसीसीआयची निवड समिती थेट आयपीएलच्या रणांगणात उतरून ‘हिऱयांची शोधमोहीम’ राबवणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आलीय. आगामी 2027 वर्ल्ड कपसाठी 20 संभाव्य खेळाडूंची यादी आयपीएलमध्येच तयार केली जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या निवडीचा खरा धमाका यंदाच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळेल.

अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितातील शिवसुंदर दास, रुद्र प्रताप सिंह, अजय रात्रा आणि प्रज्ञान ओझा हे 28 मार्चपासून सुरू होणाऱया आयपीएलमधील प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवणार आहे. मैदानावरील प्रत्येक फटका, प्रत्येक स्पेल आणि प्रत्येक दबावाचा क्षण हे सारंकाही निवड समितीच्या रडारवर असेल. हे सारं तपासलं जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या संभाव्य विशीत पोहोचण्यासाठी सारेच सर्वस्व पणाला लावून संयम राखून फटकेबाजी करण्यासाठी उतरतील, हे नक्कीच पाहायला मिळेल.

बीसीसीआयने ‘मिशन वर्ल्ड चॅम्पियन 2027’ साठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार निवड समितीचा प्रत्येक सदस्य दर आठवडय़ाला किमान एक सामना प्रत्यक्ष पाहणार, तर उर्वरित सामने टीव्हीद्वारे विश्लेषित करणार आहे. म्हणजेच, आयपीएलमध्ये चमकणारा प्रत्येक खेळाडू थेट वर्ल्ड कपच्या दारात पोहोचू शकतो.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतरच्या निवृत्तीनंतर नवा संघ उभा करण्याचं मोठं आव्हान सध्या निवड समितीसमोर आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएल फक्त स्पर्धा नाही, तर वर्ल्ड कपच्या स्वप्नाची पायाभरणी आहे. या वर्ल्ड कपमध्ये रोहित आणि विराट दोघेही खेळणार असले तरी त्यांचे वारसदार याच स्पर्धेतून निवडण्याची बीसीसीआयने आतापासूनच तयारी केली आहे. हा निवडीचा पहिला टप्पा असेल. कारण पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याची ग्रॅण्ड रिहर्सल रंगू शकते. हिंदुस्थानचा पुढचा विश्वविजेता संघ याच आयपीएलमध्ये घडणार आणि निवड समिती आता त्याच ‘हिऱयांच्या’ शोधात पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.