बाजारपेठ सुशोभीकरणाच्या मूळ आराखडय़ात बदल करून बाजारपेठेत डांबरी रस्ता काढून त्या जागेवर काळा दगड बसविण्याचे काम सुरू आहे. दगडामुळे बाजारपेठेचे सुशोभीकरण कसे होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाला प्रामाणिकपणे बाजारपेठेचे सुशोभीकरण करायचे असेल तर मूळ आराखडय़ानुसार करावे अथवा सुशोभीकरणाच्या नावाखाली शहरवासीयांच्या डोळ्यांत सुरू असलेली धूळफेक प्रशासनाने तातडीने बंद करावी, अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये पूर्वी केवळ हंगामात मोठय़ा प्रमाणावर पर्यटक हजेरी लावत असत. आता बारा महिने हे पर्यटनस्थळ पर्यटकांनी गजबजलेले दिसते. वीकेंड असो अथवा दोन-तीन सुट्टय़ा मिळाल्या की, पयर्टकांची पावले महाबळेश्वरकडे वळतात. अगदी पावसाळय़ातदेखील वर्षा सहलीसाठी पयर्टकांची मोठी गर्दी असते. दिवसभर विविध पॉईंटला भेट दिल्यानंतर पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. सायंकाळी तर पर्यटकांच्या गर्दीमुळे बाजारपेठ गजबजून गेलेली असते. पर्यटकांना बाजारपेठेतील रस्ता अपुरा पडतो. रस्त्यावर बसलेले पथारीवाले, हातगाडय़ा व दुकानदारांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे बाजारपेठेत पर्यटकांना धक्काबुक्की करीत चालावे लागते. त्यामुळे या बाजारपेठेचे बकाल स्वरूप बदलण्याची मागणी पर्यटकातून केली जात होती.
बाजारपेठेचा बकालपणा दूर करण्यासाठी व पर्यटकांना बाजारपेठेतून सहज चालता यावे, पर्यटनात वाढ व्हावी, या बाबींचा विचार करून महाबळेश्वरच्या बाजारपेठेच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्याची सूचना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनास करून या कामासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मुख्यमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे तयार केलेल्या सुशोभीकरणाच्या आराखडय़ानुसार शहर सुशोभीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले.
राज्यात सत्तांतर होताच काही दुकानदारांनी व भाडेकरूंनी पालकमंत्र्यांना गाठले व सुशोभीकरणास दुकानदारांचा विरोध असल्याचे सांगून आराखडय़ात बदल करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनीही सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे सुधारित आराखडा तयार करण्यात आला. या नव्या आराखडय़ात चार-चार फूट दुकाने मागे घेण्याची योजना रद्द करून अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच सुशोभीकरणाच्या कामाचा समावेश करण्यात आला. आता नव्या आराखडय़ानुसार जे काम सुरू आहे. त्यात डांबरी रस्ता काढून त्या जागी काळे बेसॉल्ट दगड बसविण्यात येणार आहेत. सुभाषचंद्र बोस चौक ते पोलीस ठाणे या दरम्यान अर्ध्या रस्त्यातील दगड बसविले आहेत. मात्र, या कामामुळे बाजारपेठेचे काहीही सुशोभीकरण होत नसून, केवळ शासनाकडून आलेला निधी वापरला जात आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली शासनाच्या निधीचा गैरवापर सुरू आहे. हे सुशोभीकरण नसून, विद्रूपीकरण असल्याचा आरोप नागरिक आणि व्यापारी करीत आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली महाबळेश्वरकरांची फसवणूक असून, प्रशासन नागरिकांच्या डोळय़ांत धूळफेक करीत आहे. एकतर पूर्वीचा सुशोभीकरणाचा मूळ आराखडा राबवावा अन्यथा केवळ दगड बसवून केले जाणारे बाजारपेठेचे विद्रूपीकरण तत्काळ थांबवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. ़
बाजारपेठेच्या सुशोभीकरणासाठी तयार करण्यात आलेला मूळ आराखडा सुंदर होता. सध्या जे काम सुरू आहे ते तत्काळ थांबविले पाहिजे. या कामाबाबत प्रशासनाने पुन्हा एकदा विचार करून मूळ आराखडा राबवावा.
– समीर सुतार,
अध्यक्ष, महाबळेश्वर अर्बन बँक
बाजारपेठेच्या मूळ आराखडय़ात कोणताही बदल करायचा असेल, तर नागरिकांची बैठक घ्यावी. त्या बैठकीत जे ठरेल त्याप्रमाणे सुशोभीकरण करावे. अशा बैठकीला केवळ दुकानदारांना न बोलविता गावातील प्रत्येक घटकाला बोलावून त्यांचा अभिप्राय घेतला पाहिजे.
– जावेद वलगे, संचालक, महाबळेश्वर अर्बन बँक