मंदिरात साधेपणाने लग्न, जिल्हा परिषदेच्या शाळेला 10 लाख रुपयांची देणगी; बीडच्या दाम्पत्याच्या कौतुकास्पद निर्णय

खर्चिक आणि दिखाऊ विवाहपद्धतींना छेद देत माजलगाव तालुक्यातील आबेगाव येथील शेजुळ कुटुंबाने सामाजिक जाणिवेचा आदर्श घालून दिला आहे. मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विवाहसोहळा पार पाडत या समारंभातील बचत थेट गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी अर्पण करण्यात आली आहे. या माध्यमातून शाळेला 10 लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली असून या निधीतून अद्ययावत संगणक कक्ष उभारला जाणार आहे. नवदांपत्याचा हा उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

आबेगावचे मूळ रहिवासी आणि सध्या परभणी येथे वास्तव्यास असलेले प्रा. डॉ. माधव शेजुळ यांचे चिरंजीव इंजि. शेखर शेजुळ आणि धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. वाशी) येथील ऋतुजा शिंदे यांचा विवाह 17 जुलै रोजी लातूर जिल्ह्यातील खरोळा (ता. रेणापूर) येथील दत्त मंदिर येथे हिंदू धर्मीय रीतीरिवाजानुसार साधेपणात संपन्न झाला. या विवाहाला केवळ 25 नातेवाईकांची उपस्थिती होती. कोणताही मंडप, डेकोरेशन, वाजंत्री, डीजे, बॅनरबाजी, प्री-वेडिंग शूट, आहेर किंवा हुंडा न ठेवता हा सोहळा पार पाडण्यात आला.

प्रा. डॉ. माधव शेजुळ यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय आहे. ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते असून परभणी येथील ज्ञानोपासक वरिष्ठ महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागप्रमुख पदावरून 31 मे 2025 रोजी ते सेवानिवृत्त झाले. 2019 ते 2025 या कालावधीत त्यांनी आपल्या वैयक्तिक उत्पन्नातूनच आबेगाव जिल्हा परिषद शाळेसाठी जमीन खरेदी आणि कंपाउंड वॉल उभारणीसाठी सुमारे 7 लाख रुपये दान केले होते. त्याचबरोबर इंजि. शेखर शेजुळ यांनी आपल्या नोकरीचा पहिलाच पगारही याच शाळेला अर्पण केला होता.

आता नवदांपत्याने संगणक साक्षरतेचा संकल्प करत शाळेसाठी आधुनिक संगणक कक्ष उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्याचे शेजुळ कुटुंबाने जाहीर केले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प शेखर–ऋतुजा या नवदांपत्याने व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी वधूपक्षातील प्रा. प्रभाकर माने आणि इंजि. अतुल शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

“बडेजावामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात. मुलगा आणि सून यांनी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला, याचा मला अभिमान आहे. शाळेसाठी आतापर्यंत मी 17 लाख रुपये दिले आहेत. समाजाप्रती ऋण फेडण्याचा हा प्रयत्न आहे,” असे प्रा. माधव शेजुळ यांनी सांगितले.