
बीड तालुक्यात आज अवकाळी पावसाने आज हाहाकार उडवून दिला. सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पावसाचा अनेक गावांना तडाखा बसला. जोरदार वार्यामुळे काही समजायच्या आतच ४० ते ५० घरावरील पत्रे उडून गेले. घराच्या दगडी भिंती पत्त्यासारख्या कोसळल्या. झाडे कोलमडली, उभी पीकं आडवी झाली आहेत तर भर उन्हाळ्यात नदी दूधडी भरून वाहू लागली.
बीड तालुक्यातील वलीपूर, घाटजवळा, जवळा तांडा यासह परिसरातील काही गावांना शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसासह सुसाट वार्याने मोठा तडाखा दिला. चार ते पाच गावांमध्ये हाहाकार उडाला. तब्बल ५० घरावरील पत्रे उडून गेली. अनेक घरांच्या भींतीही कोसळल्या आहेत. जनावरांचे गोठे उद्धवस्त झाले. झाडे कोलमडली, उभे पीक आडवे झाले. फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले. एवढेच काय भर उन्हाळ्यात तासभर झालेल्या पावसामुळे नदी दूथडी भरून वाहू लागली. चार ते पाच गावामध्ये उडालेल्या हाहाकारामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बहुतांश शेतामध्ये पाणी साचले आहे. या भागात गेल्या शंभर वर्षात पहिल्यांदाच अवकाळी पावसाने असा तडाखा दिल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.


























































