Beed News – भाच्च्याचे कौतुक आणि बहिणीचा अभिमान असायचा, अजित पवारांचे बीडमधील ऋणानुबंध

दिवंगत अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यापेक्षाही बीडमध्ये त्यांचे ऋणानुबंध होते. माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र धैर्यशिल सोळंके यांच्याशी अजितदादांच्या मावस बहिणीचा विवाह झाला होता. बीडमध्ये आले की, आपल्या बहिणीकडे आवर्जून जायचे. भाचा जयसिंह सोळंके यांचा अजितदादांना मोठा अभिमान वाटायचा.

अजितदादा पवार यांची सख्खी मावस बहिण उज्वलाताई यांना सोळंके कुटुंबामध्ये दिले आहे. धैर्यशिल सोळंके हे अजितदादांचे थेट मावस मेव्हुणे होय. बीडमध्ये आले की, अजितदादा आवर्जून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी यायचे. मोठा जिव्हाळा होता. बोलताना ते धैर्यशिलराव असेच बोलत. आपला भाचा जयसिंह सोळंके यांच्याबद्दल अजितदादांना मोठे कौतुक होते. राजकारणामध्ये काही धडेही त्यांनी जयसिंह सोळंके यांना दिले आहेत. राजकीय जीवनात काम करत असताना तळागाळातून काम झाले पाहिजे असेच ते बोलायचे.