
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी देशमुख कुटुंबीयांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱयांकडून पैसे गोळा करणारा आशीष विशाळ हा आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली आता भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. यामुळे धस चांगलेच अडचणीत आले आहेत.
मस्साजोग हत्या प्रकरणानंतर जे आक्रोश मोर्चे काढण्यात आले त्यावेळी आशीष विशाळ हे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने देशमुख यांच्या कुटुंबीयांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकार्यांकडून पैसे घेतल्याचा आरोपावरून मराठा आंदोलकांनी त्याला बेदम चोप दिला होता. त्याने धाराशीव शहरात खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी आमदार सुरेश धस यांनी माझा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत ‘याला आणखी तुडवा,’ असे भाष्य केले होते. दरम्यान, आता धस यांनी विशाळ हा आपला कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे.
कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करायचा?
आशीष विशाळ नेमका कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करत होता? तसेच त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफडी आणि 18 लाखांची कार आली कुठून, हा प्रश्न आहे. धाराशीवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो डीपीला ठेवून तो पैसे गोळा करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.