खोक्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी

मारहाणीसह वन्य प्राण्यांची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या खोक्या ऊर्फ सतीश भोसलेला शिरुर तालुका न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

खोक्याविरोधात 20 गुह्यांची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून खोक्या फरार होता. उत्तर प्रदेश व बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज येथून खोक्याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली.

खोक्या फरार होता. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. वन्यप्राण्यांची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रs जप्त करायची आहेत. त्यासाठी खोक्याची कोठडी हवी आहे, अशी मागणी पोलिसांनी केली. याला खोक्याचे वकील अंकुश कांबळे यांनी विरोध केला. खोक्याचे घर वन विभागाने पाडले आहे. अज्ञाताने ते जाळले आहे. आता पोलीस काय जप्त करणार आहेत, असा युक्तिवाद अॅड. कांबळे यांनी केला. उभयतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने खोक्याची रवानगी पोलीस कोठडीत केली.

खोक्याचे घर पेटवले

होळीच्या दिवशी अज्ञात व्यक्तींनी सतीश भोसलेचे वन विभागाने पाडलेले घर हे पेटवून दिले. त्यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू जाळण्यात आल्या. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलांना मारहाण केल्याचाही आरोप होत आहे.