
विकास निसर्गाच्या मुळावर उठला आहे. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जात आहे. बीड-परळी या रस्त्याचे रूंदीकरण सध्या वेगाने सुरू आहे. रूंदीकरण करताना रस्त्यात येणारी प्रत्येक गोष्ट आडवी केली जात आहे. बीडपासून परळीपर्यंत रूंदीकरणाच्या आड येणारी तब्बल तीन हजार झाडांची कत्तल झाली आहे. तीनशे, चारशे वय असणाऱ्या वड, चिंच, लिंबाची झाडं तोडण्यात आले आहेत. घाटसावळी-मोरवड या ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. झाडे नव्याने लावण्याचे नियोजन असले तरी, ती झाडांना पुन्हा पालवी फुटेल का? झाडं वाढतील का? याबाबत संशय निर्माण होत आहे.
बीड-परळी या 80 कि.मी.रस्त्याचे रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या बीडपासून जरूडपर्यंत रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. आता जरूडपासून वडवणीपर्यंत आणि वडवणीपासून सिरसाळ्यापर्यंत रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. सिमेंट रस्त्याच्या या कामात पर्यावरणाचा सर्रास र्हास केला जात आहे. रस्ता करत असताना या रस्त्यावर असलेले नैसर्गिक झाडे तोडली जात आहेत. 80 कि.मी.अंतरामध्ये तीन हजार मोठी झाडे तोडली जात आहेत. लहान-मोठ्या झाडांची तर नोंदही नाही. तीन हजार झाडांमध्ये वड, चिंच, लिंब आणि जांबळाच्या झाडांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे इतिहासाची आणि भुगोलाची साक्ष देणारी ही झाडे विकासाच्या नावाखाली नष्ट केली जात आहेत. त्यामुळे इतिहासच नव्हे तर भूगोलही बदलला जाणार आहे. सुसाट रस्त्यावरून पळताना वडाच्या झाडांनी वेढलेली घाटसावळी काही महिन्यामध्ये लुप्त पावणार आहे. वडवणी-तेलगाव रोडवर मोरवड, कुप्पा, उपळी या गावांची ओळख त्या झाडावर होती. त्याही झाडांची भविष्यामध्ये कत्तल केली जाणार आहे. दोन्ही बाजुंनी रस्ता आच्छादलेली महाकाय झाडे उन्हाळ्यामध्ये सावली देण्याचे काम करत होते. तीनशे वर्षाचा कालावधी उलटलेली ही झाडे अवघ्या काही तासांमध्ये इलेक्ट्रॉनिक कटई मशिनने नेस्तनाबूत केली जात आहेत. रस्ता पूर्ण झाल्यानंतर दोही बाजूने झाडे लावण्याचे त्या टेंडरमध्ये समावेश असल्याने झाडे लावली जातील. मात्र ती पोसली जातील की नाही आणि वाढतील की नाही याची शक्यता धूसर आहे. झाडे वाचवूनही रस्ता झाला असता मात्र, ती मानसिकता कोणास शिल्लक न राहिल्याने इतिहासाची साक्ष देणारे महाकाय वृक्ष धारातिर्थी पडत आहेत.