डिलिव्हरी बॉयने ग्राहकाच्या नाकावर दिला बुक्का, हाड मोडलं; पत्त्याचा वाद आला अंगाशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Blinkit Delivery Executive Breaks Customer's Nose in Bengaluru Over Address Dispute

धावपळीच्या जगात आता कोणतीही ऑनलाइन ऑर्डर करण्याची सवय अनेकांना लागली आहे. मात्र अशा प्रकारच्या डिलिव्हरी घेताना काही विचित्र अनुभव येऊ लागले आहेत. असाच एक प्रकार बंगळुरू मध्ये समोर आला आहे.

क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ब्लिंकिट’च्या (Blinkit) एका डिलिव्हरी एजंटने रात्री उशिरा डिलिव्हरी देण्याच्या दरम्यान झालेल्या वादातून ग्राहकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ग्राहकाच्या नाकाचे हाड मोडले असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

इंग्रजी वृत्तसंकेतस्थळ एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पॉल जे. विथयाथिल नावाच्या ग्राहकाने ७ मार्च रोजी पहाटे २:०० च्या सुमारास ब्लिंकिट अ‍ॅपवरून काही वस्तूंची ऑर्डर दिली होती. डिलिव्हरी एजंट चुकून दुसऱ्या ठिकाणी पोहोचला होता. विथयाथिल यांनी त्याला योग्य पत्त्यावर येण्यास सांगितले असता, दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.

नाकावर गुद्दा मारून केलं रक्तबंबाळ

तक्रारीनुसार, वाद वाढल्यानंतर डिलिव्हरी एजंट ग्राहकाच्या घरापर्यंत चालत गेला. तेथे त्याने विथयाथिल यांच्या नाकावर जोरात गुद्दा मारला, ऑर्डर केलेल्या वस्तू फेकून दिल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. वैद्यकीय तपासणी आणि क्ष-किरण (X-ray) अहवालात विथयाथिल यांच्या नाकाचे हाड (Nasal bone fracture) मोडल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांकडून एफआयआर दाखल

या गंभीर दुखापतीनंतर ‘मेडीको लीगल’ केस नोंदवण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनी केवळ ‘नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट’ (NCR) नोंदवला होता, परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काल याचे रूपांतर एफआयआरमध्ये (FIR) करण्यात आले आहे.

पोलिसांनी ब्लिंकिट कंपनीशी संपर्क साधून संबंधित डिलिव्हरी एजंटचा तपशील मागवला आहे. या घटनेमुळे डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांच्या सोयीसाठी असलेल्या व्यवस्था प्रकारच्या घटनांमुळे अडचणीत येत आहेत. ग्राहकांनी देखील वस्तू मागवताना, समोरील व्यक्तींशी संवाद साधतान अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.