
बंगळुरूमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. घरात खेळता खेळता अकरा महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडल्याने मृत्यू झाला. आपल्या बाळाच्या अशा अपघाती मृत्यूने नैराश्य़ात असलेल्या आईनेही स्वतःला संपवले. ‘माझ्या निष्काळजीपणामुळे मुलाचा जीव गेला’ या अपराधीपणाच्या भावनेतून या मातेने हे टोकाचे पाऊल उचलले. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगळुरू येथील भैरवेश्वरनगरमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगस्त्य वाली असे मृत बालकाचे नाव असून, त्याची आई प्रतिभा (29) ही घरी राहून एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करत होती. तिचे पती महांतेश वाली हे देखील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा महांतेश कामावर गेले होते. प्राथमिक तपासानुसार, बुधवारी संध्याकाळी प्रतिभा वाळलेले कपडे आणण्यासाठी काही वेळासाठी घराच्या गच्चीवर गेली होती. याच दरम्यान अगस्त्य रांगत बाथरूममध्ये शिरला आणि तिथे पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
गच्चीवरून खाली आल्यानंतर प्रतिभाला आपला मुलगा बादलीत मृतावस्थेत आढळला. या मुलाच्या मृत्यूमुळे ती पूर्णपणे कोलमडून गेली आणि तिने स्वतःलाच या घटनेसाठी दोषी मानले. नैराश्यातून तिने आधी औषधांच्या गोळ्या खाऊन आणि हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश न आल्याने अखेर तिने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. महांतेश रात्री कामावरून घरी परतले तेव्हा ही घटना समोर आली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने आणि बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी जवळ असलेल्या चावीने घर उघडले. आत गेल्यानंतर त्यांना पत्नीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत, तर मुलाचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक नोट जप्त केली असून, त्यामध्ये तिने मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

























































