
कुर्ला येथील बेस्ट बसच्या भीषण अपघातामध्ये काही नवीन बाबी समोर येत आहेत. हा भयंकर अपघात करणाऱया संजय मोरे याला तीन दिवस नाही तर केवळ काही वेळेपुरते अॅटोमेटिक बस चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. मोरेने दोन तीन राऊंड मारल्यानंतर त्याला अॅटोमेटिक गाडी चालविता येत असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. शिवाय अपघाताच्या वेळी बसचा ना ब्रेक फेल झाला होता, ना कुठला बिघाड झाला होता. आतापर्यंतच्या तपासात अपघाताला चालक संजय मोरे याचा निष्काळजीपणाच जबाबदार आहे असे स्पष्ट होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
सोमवारी रात्री साडेनऊ वाजता कुर्ला पश्चिमेकडील पालिकेच्या एल वॉर्ड ऑफिसजवळ 332 क्रमांकाच्या बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता इलेक्ट्रिक बस हयगयीने व बेदरकारपणे चालवत चालक संजय मोरे याने अनेक वाहनांसह पादचाऱयांना धडक दिली होती. या अपघातात सात जणांचा नाहक जीव गेला तर अजूनही अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असलेल्या संजय मोरे याने त्या दिवशी बेदरकारपणे बस चालविली. त्यामुळे कामावर रुजू करण्यापूर्वी त्याला अॅटोमेटिक इलेक्ट्रिक वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा मोरेला कामावर रुजू करण्यापूर्वी तीन दिवसांचे इलेक्ट्रिक वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते असे सांगितले जात होते. परंतु त्यात तथ्य नसून केवळ दोन-तीन राऊंड त्याला अॅटोमेटिक बस चालविण्यास दिली होती. त्या आधारे त्याला कामावर घेण्यात आले होते असे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
म्हणून मोठा अनर्थ टळला
अपघातग्रस्त बस ही सुस्थितीत होती. तिच्यात कुठलाही बिघाड झाला नव्हता पिंवा ब्रेक फेल झाला नव्हता. संजय मोरे याचेच बसवर नियंत्रण राहिले नाही आणि तो बस वेगामध्ये धडक देत घेऊन गेला. सुदैवाने तेथे कमान होती त्यामुळे बस तेथील भिंतीला धडकून थांबली आणि मोठा अनर्थ टळला, असेही सूत्राांकडून सांगण्यात येते.
25 हून अधिक जणांचा जबाब
पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्षदर्शी, प्रवासी असे मिळून 25 हून अधिक जणांचा जबाब नोंदवला आहे. सध्या त्याच्यासोबत काम करणाऱयांकडेदेखील चौकशी केली आहे. त्याला कुठलीही शारीरिक समस्या नसून तो व्यसनाधीनदेखील नाही. संजय मोरे याच्यासोबत याआधी कोणी काम केले असेल त्याला शोधून त्याच्याकडून मोरेबाबतची अधिक माहिती मिळविण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
कुर्ला बेस्ट बस अपघातात कनिस फातिमा अन्सारी (56) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामावर जात असताना त्यांच्यावर काळाचा घाला पडला. बसच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ भाभा इस्पितळात नेण्यात आले होते. मात्र या धावपळीत कनिस फातिमा यांच्या कानातले सोन्याचे इअरिंग्ज, हातातील बांगडी चोरीला गेली. हे लक्षात येताच कनिस फातिमा यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली. त्याआधारे कुर्ला पोलिसांनी कनिस फातिमा यांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी दुखाचा डोंगर कोसळलेला असतानाही हेल्मेट घातलेल्या एका अज्ञाताने त्यातही संधी साधत कनिस फातिमा यांचे सोन्याचे दागिने चोरण्याचे कृत्य केले. पोलीस त्या अज्ञात चोराचा शोध घेत आहेत.