
उपनगरांतील अनेक रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम रडतखडत सुरू आहे. त्यासाठी पालिकेने जागोजागी खोदकाम केले असून त्याचा वाहतुकीला फटका बसला आहे. ‘पीक अवर्स’ला बेस्ट बस वाहतूककोंडीत अडकत आहेत. त्यात वेळेचे गणित बिघडल्याने कित्येक नियमित बसफेऱ्यांना कात्री लावण्याची नामुष्की बेस्ट प्रशासनावर ओढवत आहे.
रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने मजास, दिंडोशी, मागाठाणे, ओशिवरा, गोरेगाव आदी आगारांतील बसफेऱयांना फटका बसला आहे. अनेक बसेस पर्यायी मार्गाने वळवल्या आहेत. ‘पीक अवर्स’ला बहुतांश गाडय़ांची रखडपट्टी होत असल्याने आगारांच्या दैनंदिन महसुलावर विपरित परिणाम झाला आहे.
स्कूल बसवर दुप्पट देखभाल खर्चाचा भुर्दंड
रस्ते अर्धवट स्थितीत खोदून ठेवल्याने त्याचा स्कूल बसच्या देखभालीवरही परिणाम झाला आहे. सकाळी-सायंकाळी स्कूल बसेस जागोजागी कोंडीत अडकत आहेत. त्यात शाळकरी मुलांचे हाल होण्याबरोबर बसचा देखभाल खर्च दुप्पटीने वाढला आहे. त्यामुळे बसचालकांचे नुकसान होत असल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.






























































