
बेस्ट उपक्रमातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांची ग्रॅच्युईटी आणि अंतिम देयकांची तब्बल 1352.68 कोटी रुपयांची देणी प्रशासनाकडे थकीत असल्याचे समोर आले आहे. ‘बेस्ट’कडे निवृत्त कर्मचाऱयांची देणी देण्यासाठी निधीच नसल्याने ही थकबाकी वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
‘बेस्ट’मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना त्यांची अंतिम देणी मिळाली नसल्याची बाब आमदार भाई जगताप यांनी सभागृहात प्रश्नोत्तर तासात मांडली. 2022 पासून बेस्टमधून निवृत्त झालेल्या 4500 कर्मचाऱयांना त्यांची ग्रॅच्युईटी आणि अंतिम देणी देण्यात आली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सेवानिवृत्तीनंतर आपली हक्काची देणी मिळवण्यासाठी निवृत्त कर्मचाऱयाना बेस्ट प्रशासनाकडे पायपीट करावी लागत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थकीत देण्यांसदर्भात आकडेवारी लिखित उत्तरात दिली.
पालिकेकडून पाच वर्षांत 6598 कोटींचा निधी
‘बेस्ट’ला आर्थिक मदत करणाऱया पालिकेने गेल्या पाच वर्षांत बेस्ट उपकमाला 6598.43 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 2025-26 मध्ये बेस्टने पालिकेकडे 2132.52 कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील पालिकेकडून बेस्टला यावर्षी एक हजार कोटींचे अनुदान मंजूर केल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.
2 ते 5 लाखांचे उपदान
सेवानिवृत्त कर्मचाऱयांची कागदपत्रे तपासून निधीच्या उपलब्धतेनुसार ग्रॅच्युईटी आणि अंतिम देयके अदा केली जातात. ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱयांना अद्याप देयके मिळालेली नाहीत, अशा कर्मचाऱयांना आजारपण, विवाह, उच्च शिक्षण आदींसाठी तातडीची मदत म्हणून 2 ते 5 लाख रुपये दिले जात असल्याचे यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.





























































