बेस्टसाठी पालिका अर्थसंकल्पात 3 हजार कोटींची तरतूद करा, ‘जीवनवाहिनी’ला सावरण्यासाठी बेस्ट कामगार सेनेची आग्रही भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
increase best budget to 3000 crore best kamgar sena writes to committee chairperson

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट कामगार सेनेने आग्रही भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी केलेली एक हजार कोटींची तरतूद फारच अपुरी आहे. त्यात वाढ करून बेस्टसाठी पालिका अर्थसंकल्पात तीन हजार कोटींची तरतूद करा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने केली आहे. यासंदर्भात बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांना पत्र देण्यात आले.

बेस्ट उपक्रमाच्या कुलाब्यातील मुख्यालयात गुरुवारी सकाळी बेस्ट समितीची बैठक पार पडली. यावेळी बेस्ट कामगार सेनेतर्फे पत्र देताना बेस्ट समिती सदस्य नगरसेविका प्रवीणा मोरजकर, सुनील आहिर, बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर, उपाध्यक्ष गणेश शिंदे, देवेंद्र कांबळे उपस्थित होते. सार्वजनिक परिवहन सेवा आणि विद्युत पुरवठा करणारा बेस्ट उपक्रम सध्या मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. बेस्टचे जून 2019 नंतर झालेले मोठय़ा प्रमाणावरील खाजगीकरण आणि खासगी कंत्राटदारांच्या चुकीच्या नियोजनामुळे बेस्ट दिवसेंदिवस तोटय़ात चालली आहे. मागील तीन वर्षांपासून बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱयांची जवळपास 1500 कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. याच अवधीत बेस्टचा संचित तोटा 10 हजार कोटींच्या घरात गेला आहे. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी केलेली एक हजार कोटीची तरतूद अत्यंत कमी आहे. बेस्टचा तोटा तसेच निवृत्त कर्मचाऱयांची थकीत देणी याचा विचार करून तीन हजार कोटींची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने केली आहे.