भरत गोगावलेंच्या मुलाचं महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण, सर्व आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी

दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिये दरम्यान शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये झालेला वाद आणि हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांतील फरार आरोपी आज पोलिसांसमोर शरण आले. न्यायालयाने या दोन्ही गटांतील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर, त्यांना ही शरणागती पत्करावी लागली. शरण आलेल्यांमध्ये शिंदे गटाच्या विकास गोगावले यांच्यासह आठ जणांचा तर अजित पवार गटाच्या हनुमंत जगताप यांच्यासह पाच जणांचा समावेश आहे.

२ डिसेंबर रोजी महाड नगरपालिका निवडणुकीचे मतदान सुरू असताना शिंदे आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यामध्ये वाद निर्माण झाला होता. या वादाच्या वेळेस रिव्हॉल्वर दाखवून दोन्ही गटांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

या प्रकरणी अजित पवार गटाचे सुशांत जाबरे आणि शिंदे गटाचे महेश गोगावले यांनी महाड एमआयडीसी आणि महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारी झाल्यानंतर दोन्ही गटातील सर्व संशयीत आरोपी फरार झाले होते. गेले दिड महिना महाड शहर पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत. सर्व आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र काल त्यांचा जामीन फेटाळण्यात आला आणि त्यांना त्वरित पोलिसांसमोर हजर होण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

न्यायालयाच्या या गंभीर इशार्‍यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी विकास गोगावले यांच्यासह त्यांच्या इतर सात सहकार्‍यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात जावून आज समपर्ण केले. यामध्ये विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले, विजय मालुसरे, धनंजय मालुसरे, प्रशांत शेलार, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे, आणि सिध्देश शेठ यांचा समावेश असल्याची माहिती महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या आरोपींकडे जो तपास करणे आवश्यक आहे. तो करण्याचे काम सुरु असल्याचेही, काळे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार गटाच्या पाच जणांचीही शरणागती

दरम्यान याच प्रकरणात विरुद्ध गुन्हा दाखल असलेल्या अजित पवार गटातील पाच आरोपींनी देखील आज दुपारी महाड तालुका पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. यामध्ये अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, जिल्हा प्रवक्ता धनंजय देशमुख, अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष निलेश महाडीक, श्रीयश जगताप आणि जगदीश पवार यांचा समावेश आहे.या सर्वांनी शरणागती पत्करल्यानंतर त्यांना रितसर ताब्यात घेवून सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती.

न्यायालय वेळेनंतरही सुरू

या सर्व आरोपींना आजच सायंकाळी महाड न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

सर्व आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी

आज सायंकाळी दोन्ही गटांतील आज अटक झालेल्या आरोपींना महाड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळीस सर्व आरोपींचा दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार सर्वांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींमध्ये जिल्हा परिषदेचे दोन उमेदवार

आज शरण आलेल्या आरोपींमध्ये जिल्हा परिषदेची निवडण्ाूक लढवित असलेल्या विकास गोगावले (शिवसेना) आणि निलेश महाडीक (राष्ट्रवादी काँग्रेस) या दोघांचा समावेश आहे. या दोघांनीही महाड तालुक्यातील नाते जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हे दोघेही प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.