प्रसिद्ध भरतनाटय़म नर्तिका ‘पद्मश्री’ गीता चंद्रन ‘प्रवाहाती’ हा नृत्याविष्कार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे सादर करणार आहेत. या सादरीकरणातून चंद्रन यांचा भारतीय शास्त्रीय नृत्यातील 50 वर्षांचा थक्क करणारा प्रवास उलगडणार आहे. 1991 मध्ये स्थापन केलेल्या ‘नाटय़वृक्ष’ या सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून चंद्रन यांनी नर्तक आणि शिक्षक म्हणून भरतनाटय़मच्या सखोलतेचा शोध घेण्यासाठी अनेक दशके कष्ट घेतले. ‘प्रवाहाती’मधून भरतनाटय़म या प्राचीन कला प्रकाराला नवीन दृष्टिकोन मिळेल असा त्यांना विश्वास आहे. ‘प्रवाहाती’ वेळ आणि स्थळ या दोन्हींचा अस्थिर म्हणून शोध घेते, परंतु त्याचवेळी कल्पनाशक्ती आणि सादरीकरण या दोन्हींना पुढे नेते. याबद्दल गीता चंद्रन म्हणतात, ‘नृत्य हे जीवनाप्रमाणे, परंपरेपुरते मर्यादित राहू नये, तर कलाकाराच्या स्वभावानुसार त्याची पुनर्व्याख्या होऊन ते विकसित झालं पाहिजे.’ ‘मल्लारी’, ‘ऋतुसंहारा’, ‘वाहती’ आणि ‘तिल्लाना’ या चार उद्बोधक सादरीकरणांमधून प्रवाहातीचे नृत्यदिग्दर्शन उलगडते.